मुंबई - महाराष्ट्र नेहमीच त्याचा सांस्कृतिक वारसा जपत आला आहे. येथील लोककला मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनही करीत आल्या आहेत. कीर्तन हा प्रकार त्यातीलच एक. कीर्तन आणि कीर्तनकार याबद्दल पाश्चिमात्य संस्कृतीकडे झुकलेल्या तरुण पिढीला कळावं यासाठी 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाची आखणी झाली असून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा गजर करणाऱ्या सोनी मराठीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या आगळ्या-वेगळ्या कीर्तन आधारित रिअॅलिटी शोनं आता थेट सेलिब्रिटींचेही मनं जिंकली आहेत. नुकतीच या शोच्या भक्तिमय मंचावर ज्येष्ठ अभिनेती, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी खास हजेरी लावली आणि क्षणभर साऱ्या वातावरणावर विठ्ठलमय गारुड पसरलं.
या खास प्रसंगी महेश मांजरेकर पारंपरिक धोतर-कुर्त्यात सजून आले होते. “असा कार्यक्रम करणं हे माझ्यासाठी अत्यंत समाधानदायक आणि अभिमानास्पद आहे,” अशा शब्दांत त्यांनी शोच्या संकल्पनेचं भरभरून कौतुक केलं. मंचावर उपस्थित असताना, स्पर्धकांच्या भारावून टाकणाऱ्या सादरीकरणांनी प्रेरित होऊन त्यांनीही ‘विठूचं नाव मनी जोडलं’ हे मनोहर गीत सादर केलं. त्यांच्या आवाजातील विठुरायाची ही साद परीक्षकांसह प्रेक्षकांच्याही काळजाला भिडली.
मांजरेकर यांच्या उपस्थितीनं स्पर्धकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. “असे दिग्गज कलाकार समोर असताना सादरीकरणाला वेगळीच उर्जा मिळते,” असं स्पर्धकांनी सांगितले. कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिरसात न्हालेल्या या प्रवासात प्रेक्षकही सहभागी होत आहेत. हा खास भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महेश मांजरेकर यांचा आगामी देवमाणूस हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देवस्कर यांनी केलं आहे. दरम्यान या चित्रपटाद्वारे निर्माते लव रंजन हे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 25 एप्रिल 2025 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर हे वारकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' हा कार्यक्रम सोनी मराठीवर प्रसारित होत असतो.
हेही वाचा -
- ३८ वर्षांनंतर श्रीनगरमध्ये चित्रपटाचं प्रीमियर, 'ग्राउंड झिरो' स्टार इमरान हाश्मी घाटीत पोहोचला...
- 'जाट' चित्रपटातून ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखल्याबद्दल सनी देओल, रणदीप हुड्डाविरुद्ध एफआयआर दाखल....
- 'मी शाहरुख खानपेक्षाही जास्त बिझी आहे', इंडस्ट्री सोडण्याच्या प्रश्नावर अनुराग कश्यपचं सडेतोड उत्तर