मुंबई - अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मालिक’ चित्रपटातील पहिलं गाणं, ‘नामुमकिन’, प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘नामुमकिन’ हे गाणं सचिन-जिगर यांनी संगीतबद्ध केलं असून, अमिताभ भट्टाचार्य यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेली ही रचना वरुण जैन आणि श्रेया घोषाल यांच्या भावपूर्ण आवाजात सजली आहे. गाण्याच्या माध्यमातून गँगस्टरच्या प्रेमळ स्वभावाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
‘मालिक’ चित्रपटातील गाणं प्रेक्षकांना आलं पसंत : टिप्स फिल्म्स आणि नॉर्दर्न लाइट्स फिल्म्सच्या बॅनरखाली येणाऱ्या ‘मालिक’ या बहुप्रतीक्षित अॅक्शन-ड्रामा असलेल्या चित्रपटातील ‘नामुमकिन’ नुकतंच रिलीज झालेलं गाणं आता अनेकांना पसंत येत आहे. राजकुमार राव आणि मानुषी छिल्लर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या गाण्यात एका निर्दयी गँगस्टरच्या हृदयस्पर्शी प्रेमकथेला उजाळा देण्यात आला आहे. राजकुमार रावनं साकारलेल्या गँगस्टरच्या भूमिकेमुळं हा चित्रपट त्याच्या अभिनय क्षमतेला नवीन उंचीवर नेईल, अशी अपेक्षा आता केली जात आहे. तसेच राजकुमार रावचा अभिनय हा अनेकांना खूप आवडतो. आता राजकुमार रावच्या चाहत्यांना या चित्रपटामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. दरम्यान रिलीज झालेल्या टीझरमध्ये काही दृष्य कॉमेडी देखील दाखविण्यात आले आहेत.
‘मालिक’ चित्रपटाचा टीझरला मिळाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद : यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मालिक’च्या टीझरला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. राजकुमार रावचा कधीही न पाहिलेला गँगस्टर अवतार, प्रभावी अभिनय, जबरदस्त दृश्यांकन आणि कथानकामुळं हा चित्रपट आधीच चर्चेचा विषय ठरत आहे. ‘मालिक’चे दिग्दर्शन पुलकित यांनी केलं असून, त्यांनी याआधी थरारक आणि भावनिक चित्रपटांसाठी विशेष ओळख कमावली आहे. कुमार तौरानी (टिप्स फिल्म्स) आणि जय सेवकरामाणी (नॉर्दर्न लाइट्स फिल्म्स) यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘मालिक’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ११ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत.
हेही वाचा :