मुंबई - ७८ वा आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सव १३ मे रोजी सुरू झाला असून २४ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप अभिमानाचा क्षण पाहायला मिळाला. दिग्दर्शक नीरज घायवान यांचा 'होमबाउंड' हा चित्रपट बुधवारी 'अन सर्टेन रिगार्ड' विभागात प्रदर्शित झाला. जान्हवी कपूर, इशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी नऊ मिनिटं उभं राहून टाळ्यांच्या गजरात सलामी दिल्यानं हा क्षण खूपच भारावून टाकणारा होता.
सिनेमॅटोग्राफर असीर अदीब यांनी इंस्टाग्रामवर कान्स प्रीमियरमधील काही पडद्याच्या मागील क्षण शेअर केले आहेत. यामध्ये दिग्दर्शक नीरज घायवान निर्माता करण जोहर आणि संपूर्ण टीमला आनंदानं मिठी मारताना दिसत आहे. व्हिडिओ पुन्हा पोस्ट करताना, घायवान यांनी चित्रपटाच्या दीर्घ प्रवासावर भाष्य केलं आहे. एका न्यूजवायरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की, "मी या चित्रपटावर चार वर्षांपासून न थांबता काम करत आहे, एक दिवसही सुट्टी नाही, काहीही नाही."
9 minutes of pure love & applause!🤌🏻
— Dharma Productions (@DharmaMovies) May 21, 2025
Team Homebound receiving all the appreciation at @Festival_Cannes! pic.twitter.com/QFlnw13810
चित्रपटाच्या पाठीशी ठामपणे उभं असलेल्या धर्मा प्रॉडक्शननं कान्स महोत्सवात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिलीय. कार्यक्रमातील एक व्हिडिओ शेअर करताना, प्रोडक्शन हाऊसनं लिहिलं की, "9 मिनिटं शुद्ध प्रेम आणि टाळ्या! कान्स फेस्टिव्हलमध्ये टीम होमबाउंडचं सर्वांकडून कौतुक होत आहे!"
पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रेक्षक आणि पत्रकार टाळ्यांचा कडकडाट करताना दिसतात, तर भावनिक झालेला नीरज घायवान निर्माता करण जोहरला मिठी मारताना दिसतोय. कलाकार जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा देखील प्रेक्षकांनी मनापासून दिलेल्या या प्रेमाचा स्वीकार करताना दिसत आहेत.
होमबाउंड हा चित्रपट उत्तर भारतीय गावातील दोन मित्रांची कहाणी आहे. समाजात मानसन्मान मिळावा म्हणून ते पोलीस दलात नेकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी ते जसजसे अधिक प्रयत्नशील होतात तसे त्यांच्या घट्ट मैत्रीला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. श्रीधर दुबे, नीरज घायवान आणि वरुण ग्रोव्हर यांनी सह-लेखन केलेला हा चित्रपट महत्वाकांक्षा, निष्ठा आणि सामाजिक अपेक्षांच्या प्रचंड दबावाच्या मुद्द्यांना स्पर्श करतो. या चित्रपटात कार्यकारी निर्माता म्हणून काम करणारे प्रतिष्ठित हॉलिवूड दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्से यांच्याकडून एक मोठं आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील मिळालं होतं.
हेही वाचा -
- सिनेमाला सेन्सॉरनं प्रमाणपत्र नाकारल्यानंतर ‘टॅक्स फ्री इंडिया’ थेट यूट्यूबवर रिलीज, दिग्दर्शक सुबोध जयप्रकाश यांचा धाडसी प्रयत्न
- साऊथ स्टार धनुष अभिनीत 'कलाम: द मिसाईल मॅन ऑफ इंडिया'चा फर्स्ट लूक आला समोर..
- सलमान खानच्या मुंबईतील घरात घुसण्याचा प्रयत्न करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात, या आठवड्यात घरी घुसण्याचा हा दुसरा प्रयत्न