बेंगळुरू : अभिनेता नानी त्याच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'हिट ३'च्या प्रदर्शनासाठी पूर्णपणे सज्ज आहे. या चित्रपटाचे तो सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच नानी त्याच्या टीमसह चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कर्नाटकला पोहोचला होता. यादरम्यान, अभिनेत्याला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अभिनेत्यानं दु:ख व्यक्त केलं. दरम्यान कर्नाटकातील बेंगळुरू येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना, अभिनेता नानीनं या हल्ल्याचा त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण टीमवर किती परिणाम झाला याबद्दल उघड करत म्हटलं, "मला वाटते की घटनेचा या जागेवर दीर्घकालीन परिणाम होईल. खरोखरच हा हल्ला खूप वेदनादायक आणि धक्कादायक होता. या बातमीनं आपल्या सर्वांचे मन तुटले आहेत, केवळ आपलेच नाही तर सर्वांचे मन तुटले आहेत."
'हिट ३'चं शूटिंग पहलगाममध्ये झाले : नानीनं पुढं म्हटलं, "मी सोशल मीडियावर काही क्लिप्स पाहिल्या, ज्यामध्ये लोक तिथे खूप मजा करत होते. एक क्लिप पाहिली ज्यामध्ये एक व्यक्ती झिप लाईनिंग करत असताना त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत होता आणि अचानक संपूर्ण घटना त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. अशा प्रकारच्या वाइल्ड फोर्सेस अजूनही आपल्यासमोर येत आहेत, त्यांच्याविरुद्ध काही कडक कारवाई करण्याची गरज आहे. आता एक आशा उत्पन्न करण्याची गरज आहे, मला माहिती नाही आपण कुठे जात आहोत." दरम्यान 'हिट ३'मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगामचे दृश्ये देखील दिसतील. कदाचित यामुळेच अभिनेता नानी आणि त्याची टीम या हल्ल्याबद्दल खूप भावनिक झाली होती.
पहलगामचे सुंदरमधील सुंदर क्षण : तसेच नानीनं चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेची आठवण करून देत म्हटलं, "ज्या दिवशी ही घटना घडली, तो दिवस आणखी भयानक होता, कारण आम्ही तिथे शूटिंग केली होती. आम्ही तिथे १८ दिवस शूटिंग केली. आम्हाला आणि आमच्या टीमला तिथल्या स्थानिक लोकांकडून खूप पाठिंबा मिळाला." यानंतर नानीनं पुढं सांगितलं, "मला आठवते की दररोज सकाळी मी उठून पहलगामकडे पाहत असं म्हणायचो, व्वा,हे किती सुंदर ठिकाण आहे. तिथे बरेच पर्यटक होते, जे कर्नाटक, आंध्र प्रदेशचे होते, ते त्यांच्या कुटुंबियांबरोबर होते. जेव्हा मी रिसॉर्टवरून खाली येत होतो, तेव्हा मी शूटिंगला जाण्यापूर्वी त्यांच्याबरोबर फोटो काढले. ते हसरे चेहरे मला अजूनही आठवतात. ते त्यांच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी आणि खूप मजा करण्यासाठी आले होते. हे शब्दात कसे मांडायचे ते मला कळत नाही. तो हल्ला विनाशकारी आणि भयानक आहे. अशी घटना पुन्हा कधीही घडू नये अशी मी देवाला प्रार्थना करतो."
'हिट ३'क्रू आणि स्टार कास्ट : 'हिट ३' चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश कोलानू यांनी केलंय. या चित्रपटात नानीबरोबर 'केजीएफ' फेम श्रीनिधी शेट्टी आहे. या चित्रपटात सूर्या श्रीनिवास, राव रमेश, ब्रह्माजी, कोमली प्रसाद आणि इतर कलाकार आहेत. वॉल पोस्टर सिनेमाच्या बॅनरखाली नानी आणि प्रशांती टिपिरनेनी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट १ मे रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :