अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं महाराष्ट्र दिनानिमित्तानं 'या' आगामी चित्रपटाची केली घोषणा...
प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी त्यांचा नवीन चित्रपट 'क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम' घोषणा केली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : May 1, 2025 at 12:54 PM IST
मुंबई : मराठी चित्रपट 'झिम्मा', 'झिम्मा २', 'फसक्लास दाभाडे' यांसारखे हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्तानं त्यांच्या 'क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम' या आगामी चित्रपटाची घोषणा करून मराठी रसिकांना खुश केलं आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी या निर्मिती संस्थेचा हा पाचवा सिनेमा असणार आहे. तसेच आनंद एल राय यांच्या कलर यल्लो प्रॅाडक्शनबरोबर त्यांचा हा तिसरा चित्रपट आहे. मराठी शाळांमधील शिक्षणपद्धती, मातृभाषेत शिकण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये मराठी भाषेमधील शाळा कमी होत असल्याचं दाखविण्यात येणार आहे.
'क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम' चित्रपटाची केली घोषणा : मराठी शाळा या आजकाल खूप कमी होत आहे, त्याचं पार्श्वभूमीवर हा चित्रपट हेमंत ढोमे प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. दरम्यान हेमंत ढोमे यांनी यापूर्वी 'झिम्मा’, झिम्मा २', 'फसक्लास दाभाडे' या मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांवर प्रभाव पाडला आहे. 'क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम' चित्रपटाचं लवकरच शूटिंग सुरू होईल. याबद्दल देखील काही दिवसांनी प्रेक्षकांना अपडेट मिळेल.
हेमंत ढोमे यांनी व्यक्त केल्या भावना : दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल! मी स्वतः रायगड जिल्ह्यात 'जिल्हा परिषद' शाळेत शिकलेला विद्यार्थी…. मराठी माध्यमात शिक्षण पूर्ण करून पुढे युकेला आणि केंट विश्वविद्यालयमध्ये जाऊ वन्यजीव संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. मनापासून सांगतो… जागतिक पातळीवर आपण मराठी माध्यमात शिक्षण घेतलं याचा खरंतर तोटा कमी आणि फायदाच जास्त झाला! माझ्या युके मधल्या मित्रांना, माझ्या शिक्षकांना माझं मराठी शाळेतलं शिक्षण, माझी संस्कृती, माझी जडणघडण सारंकाही अभिमानानं सांगता आलं आणि त्याचं त्यांनी प्रचंड कौतुक देखील केलं! मराठी माध्यमात म्हणजे आपल्या मातृभाषेत शिकताना आपलं साहित्य, आपल्या परंपरा आणि संस्कृती याची भक्कम ओळख झाली आणि स्वतःबद्दल, स्वतःच्या संस्कृती बद्दल अभिमान बळकट झाला! मी आज जो काही घडलो आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच…'
हेमंत ढोमे यांची पोस्ट : यानंतर त्यांनी पुढं लिहिलं, 'आजकाल मराठी माध्यमातल्या शाळांमधला पट कमी होऊन, खूप मराठी शाळा बंद होत आहेत, जी मराठी भाषेसाठी अत्यंत काळजीची बाब आहे… या कठीण काळात माझ्या या नव्या चित्रपटातून आपल्या मुळ भाषेतलं शिक्षण हे कमीपणाचं नसून समृद्ध करणारं असतं, हे सांगायचा माझा प्रयत्न आहे… मराठी शाळा टिकल्या तर, मराठी भाषा टिकेल आणि पर्यायानं आपली मराठी संस्कृती! या काळात प्रचंड मोठ्या जनजागृतीची गरज आहे, मी माझ्या पासून सुरूवात करतोय… पुन्हा एकदा माझ्या या नव्या चित्रपटातून मी जे जगलो, मी जे शिकलो आणि त्यातून कसा समृद्ध झालो हा प्रवास सांगायचा आहे! माझ्या आजवरच्या सर्व मराठी शाळांना, माझ्या शिक्षकांना, शाळेच्या शिपायांना, माझ्या वर्गमित्रांना… माझा सलाम! आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं! चलचित्र मंडळीचा पाचवा सिनेमा 'क्रांतीज्योति विद्यालय - मराठी मिडीयम' लवकरच तुमच्या भेटीला! मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! आता मराठी शाळा पुन्हा भरणार!' दरम्यान या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन हेमंत ढोमे यांचं कौतुक करत आहेत.

