ETV Bharat / entertainment

विजय तेंडुलकर लिखित मराठीतलं 'माइलस्टोन' नाटक ‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदी रंगभूमीवर!

विजय तेंडुलकर लिखित गाजलेलं मराठी नाटक ‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ghashiram Kotwal
‘घाशीराम कोतवाल’ (Etv bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : August 1, 2025 at 11:06 AM IST

|

Updated : August 1, 2025 at 2:59 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - मराठी नाटकं त्यांच्या प्रभावी लेखनशैली आणि विषय वैविध्यतेमुळं नेहमी प्रभावशाली राहिली आहेत. हा प्रभाव इतर भाषिक रंगभूमीवर जाणवत आला आहे, कारण अनेक मराठी नाटकं अन्य भाषांमध्ये रूपांतरित होऊन तेथील रंगभूमींवर सादर झालेली आहेत. आता, काळाच्या पुढं असलेले, 1972 साली पहिल्यांदा सादर झालेलं, विजय तेंडुलकर लिखित अत्यंत गाजलेलं मराठी नाटक ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर येत आहे.

विजय तेंडुलकरांचं ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर : 'घाशीराम कोतवाल' हे विजय तेंडुलकर लिखित गाजलेलं, वादग्रस्त ठरलेलं आमि मराठी रंगभूमीवर इतिहास रचणारं नाटक आहे. पेशवेकालीन राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समाजातील सत्तेचा गैरवापर, राजकीय स्वार्थ आणि क्रौर्य यावर या नाटकातून तीव्र भाष्य केलं आहे. या नाटकाचं संगीत, नृत्य आणि लयबद्ध संवाद यामुळे ते एक वेगळं सौंदर्य घेऊन रंगभूमीवर अवतरलं. पाच दशकांपूर्वी सादर झालेलं हे नाटक आजही तितकंच प्रभावी ठरतं. डॉ. जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन, डॉ. मोहन आगाशे यांच्यासह इतर कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा, कृष्णदेव मुळगुंद यांचं नृत्य दिग्दर्शन आणि भास्कर चंदावरकर यांच्या संगीत दिग्दर्शनाने मूळ मराठी नाटक वेगळ्या उंचीवर नेलं होतं. आता या नाटकाच्या हिंदी आवृत्तीमध्ये संजय मिश्रा प्रमुख भूमिका निभावणार दिग्दर्शनाची धुरा अभिजीत पानसे यांनी सांभाळली आहे. या नाटकाची हिंदी संहिता प्रसिद्ध कवी आणि लेखक प्रा. वसंत देव लिहिली असून मूळ कथानकातील राजकीय आणि सामाजिक आशय कायम ठेवण्यात आला आहे. नाना फडणवीस आणि घाशीराम यांचं नातं, सत्तेचा खेळ आणि त्यातून समोर येणारी क्रूरता हे सारं आजही प्रेक्षकांना अंतर्मुख करणारं ठरेल, या नाटकाशी जोडल्या गेलेल्या रंगकर्मींना खात्री आहे.

Ghashiram Kotwal
‘घाशीराम कोतवाल’ (Etv bharat)

‘घाशीराम कोतवाल’ अनेक भारतीय भाषांमध्ये सादर होईल : तब्बल 52 वर्षांपूर्वी, 16 डिसेंबर 1972 घाशीराम कोतवाल या मूळ मराठी नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्या काळात स्वघोषित संस्कृतीरक्षक आणि 'नाट्यधर्मी' यांच्यात या नाटकामुळे प्रचंड संघर्ष झाला. विजय तेंडुलकरांची ही नाट्यकृती देश-विदेशात नावाजली गेली. इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा या नाटकाचे प्रयोग झाले, ते वाखाणले गेले. आजवर अनेक भाषांमध्ये मंचन झालेल्या या नाटकाचा हिंदी रंगभूमीवर मात्र एकही प्रयोग झाला नव्हता. ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि सहदिग्दर्शक भालचंद्र कुबल यांनी केला असून, या प्रयोगात त्यांनी नाटकातल्या प्रमुख व्यक्तिरेखेसाठी हिंदीतील चरित्र अभिनेता यांची निवड केली.

Ghashiram Kotwal
‘घाशीराम कोतवाल’ (Etv bharat)

संजय मिश्रा यांनी व्यक्त केल्या भावना : मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संजय मिश्रा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, “नाटकात काम करण्याची खूप पूर्वीपासून इच्छा होती, पण वेळ मिळत नव्हता. ‘घाशीराम कोतवाल’ सारख्या गहन आशयाच्या नाटकात काम करणे ही माझ्यासाठी एक अमूल्य संधी आहे.” मराठी नाटकांमध्ये आजही समाजाचं प्रतिबिंब उमटतं आणि त्या अनुभवातूनच नाटक प्रेक्षकांशी नातं जोडतं, असंही ते म्हणाले. या प्रसंगी अभिनेता मकरंद देशपांडे यांनी संजय मिश्रा आणि अभिजित पानसे यांचे कौतुक करत म्हटलं, “इतकं गडद आणि जिवंत नाटक सादर करणं हे मोठं आव्हान आहे, आणि ही जबाबदारी सक्षम कलाकार आणि सर्जनशील टीमनं घेतली आहे याचा आनंद आहे.” दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी सांगितलं की, "मूळ नाटकात संगीत आणि नृत्याचा मोठा सहभाग होता, त्यामुळे या हिंदी सादरीकरणातही 12-15 वाद्यांमधून साकारलेलं लाईव्ह संगीत, पारंपरिक लावणी आणि कव्वाली या सगळ्यांचा सुरेख संगम असेल." सहदिग्दर्शक भालचंद्र कुबल यांनी सांगितलं की, “मराठी नाटकांचं सौंदर्य आणि विचारसंपन्नता ही इतर भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यातूनच हे हिंदी सादरीकरण घडून आलं आहे.”

‘घाशीराम कोतवाल’ (Etv bharat)

हिंदी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाबद्दल : ही निर्मिती आकांक्षा माळी यांच्या ‘33 एएम स्टुडिओ’ आणि अभिजीत पानसे यांच्या ‘रावण फ्युचर प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारत आहे. या नाटकातसंजय मिश्रा यांच्याबरोबरच संतोष जुवेकर आणि उर्मिला कानिटकर या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहेत. तब्बल 60 कलाकारांच्या संचात सादर होणाऱ्या या नाटकात भव्यता जपण्यात येणार आहे. या नाटकासाठी गीतं अशोक बागवे, चंद्रशेखर सानेकर, सुनिता शुक्ला त्रिवेदी आणि मंदार देशपांडे यांनी लिहिली असून, संगीत मंदार देशपांडे यांचे आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे, नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांचं आहे. प्रकाश योजना हर्षवर्धन पाठक, वेशभूषा अभिजित पानसे आणि चैत्राली डोंगरे यांनी तर वस्त्रनिर्मिती बळवंत काजरोळकर यांनी केली आहे. अभिजात मूळ मराठी नाटकाशी तुलना होणार असली तरी हिंदी प्रेक्षकांसाठी 'घाशीराम कोतवाल’ हे नाटक एक समृद्ध सांस्कृतिक अनुभव ठरेल असा या नाटकाच्या निर्मात्यांचा विश्वास आहे.

Last Updated : August 1, 2025 at 2:59 PM IST