मुंबई - 'फँडी' या चित्रपटातील भूमिकेमुळं लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळं ती खूप चर्चेत आली आहे. तिनं पाण्यात उतरुन बाप्तिस्मा घेत असल्याचा फोटो पोस्ट केला होता. तिनं फोटोला 'Baptised' असं कॅप्शन दिलं होतं. यामुळं तिनं ख्रिश्चन धर्माचा बाप्तिस्मा घेतल्याची माहिती उघड झाली आहे.
राजेश्वरीची ही पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर तिच्यावर ट्रोल करणारे तुटू पडले. नेहमीप्रमाणे यामध्ये ट्रोलर्सनी आपल्या भाषेचा दर्जा खालच्या पातळीवर नेला आणि वाईट कमेट्स द्यायला सुरूवात केली. मात्र राजेश्वरीनं या ट्रोलर्सचा समाचार आपल्या स्टाईलनं घेतल्याचं दिसतंय. आपल्यावर टीका करणाऱ्यांची मानसिकता कशा प्रकारची आहे हे सांगण्यासाठी तिनं एक स्वतंत्र पोस्ट लिहिली होती.
राजेश्वरी खरातचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर - ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना राजेश्वरी खरातनं लिहिलं की, 'निवडणूकामध्ये मतदान करण्यासाठी ५०० रुपये घेणारे, किराणा मालाच्या पिशव्या स्वीकारणारे, हॉटेलात दारु आणि जेवणाची पार्टी करणारे...साहेब, दैवत आणि देव माणूस यांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारे लोक आज मला धर्म आणि जात शिकवायला आलेत, त्यांचं मी स्वागत करते.' अशा आशयाचं विधान तिनं आपल्या पोस्टमध्ये केलं. आपल्या पोस्टमध्ये पुढं तिनं म्हटलं होतं की, ''कोणी पैश्यांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात, माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे.'' राजेश्वरी खरातनं आणखी स्पष्टता येण्यासाठी टीपमध्ये लिहिलंय की, "माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे, आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती." तिच्या वरील दोन्ही पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाल्यानंतर तिनं या पोस्ट डिलीट केल्या आहेत.
काय असतो बाप्तिस्मा विधी? - बाप्तिस्मा हा ख्रिश्चन धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. यामध्ये त्या व्यक्तीला पाण्यात बुडवून किंवा पाणी ओतून शुद्ध केलं जातं. या विधीच्या माध्यमातून व्यक्ती ख्रिस्ताचे अनुयायी बनतात, असं मानलं जातं. राजेश्वरी खरातनंही बाप्तिस्मा विधी झाल्याचं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं.
फँड्री चित्रपटामुळं मिळाली प्रसिद्धी - राजेश्वरी खरात हिनं नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' या चित्रपटात युवा नायिकेची भूमिका केली होती. या चित्रपटाचा नायक जब्या उर्फ जांबूवंत हा शालू या मुलीवर प्रेम करत असतो. मात्र सवर्ण जातीतील शालूशी बोलण्याची जब्याची हिंमत होत नाही. ग्रामीण जीवनातील जातीपातीची उतरंड आणि सामाजिक जीवनाचं दर्शन या चित्रपटानं अतिशय प्रभावीपणे दाखवलं होतं. या चित्रपटासाठी नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकिय पदार्पणाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
राजेश्वरी खरात उर्फ शालू - 'फँड्री' या चित्रपटात राजेश्वरीनं साकारलेली शालू ही व्यक्तीरेखा खूप संस्मरणीय ठरली. जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा राजेश्वरी खरात शालेय शिक्षण घेत होती. आता तिनं पंचवीशी पार केली असून सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ती बनवत असलेली रील्सही पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
हेही वाचा -