शिर्डी ( अहमदनगर ) - गेल्या साठ वर्षापासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत आहे. आधी मुंबईहुन नाशिकला यावं लागत होतं, त्यानंतर शिर्डीला. त्याकाळी शिर्डीला येण्यासाठी रस्ते ठीक नव्हते, असे असतांनादेखील मी दर महिन्याला शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेत होते. त्यावेळी खास करून साईबाबांच्या द्वारकमाईत बसून काही काळ साईबाबांचं ध्यान करत असायचे, अशा अनेंक जुन्या आठवणींना प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी यावेळी उजाळा दिला आहे. पती भोसले यांच्याबरोबर शिर्डीत यापूर्वी आले होते याचा उल्लेखही त्यांनी यावेळी बोलताना केला. आशा भोसलेंच्या आगमनानं साई मंदिर परिसरात भाविकांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि प्रसिध्द गायिका आशा भोसले यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचे मनोभावे दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शॉल, साई मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. साईबाबांच्या दर्शनानंतर आशा भोसले यांनी माध्यमांशी बोलतांना अनेंक जुन्या आठवणींना उजाळा देत, सध्याच्या गर्दीकडे लक्ष वेधत वाढत्या गर्दीमुळे देवाला काचेत बंद करावं लागलंय, असं म्हटलं. देवाला बांधून ठेवावं लागतंय, याची खंत देखिल आशा भोसले यांनी व्यक्त केलीय.
साठ वर्षांपूर्वी साईबाबांच्या द्वारकमाईत मी दिवस दिवसभर बसायचे त्यावेळी मला एक वेगळीच अनुभूती मिळत होती. मात्र आता ती मिळत नाही. त्याकाळी भाविकांची एवढी गर्दी नसायची त्यामुळं शांत बसून साईबाबांचं ध्यान करता येत होतं.आता भाविकांची गर्दी वाढत असल्यानं पहिल्या सारखं ध्यान करता येत नाही. त्याच बरोबर साईबाबांच्या द्वारकमाईमधील धुनी, साईबाबा बसायचे ती शिला काचेत बंदिस्त नव्हती, हात लावून दर्शन घेता येत होतं. मात्र आता या सर्व वस्तू काचेत बंदिस्त करून ठेवल्या आहेत. साईबाबांच्या समाधीच्या बाजूनं देखील काचा लावण्यात आल्या आहेत. भाविकांची वाढत्या गर्दीमुळे साईबाबांच्या वस्तुंना इजा व्हायला नको म्हणून संस्थानाला हा निर्णय घ्वाया लागलाय, असंही यावेळी आशा भोसले म्हणाल्या.
हेही वाचा -