मुंबई - एकता कपूर, सुपरस्ट्सर जितेंद्र यांची कन्या, हे एक नाव आहे, जे आज भारतीय मनोरंजन विश्वातील दर्जा, नवोन्मेष आणि यशाचं प्रतीक बनलं आहे. ती भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक प्रभावशाली आणि क्रांतिकारी प्रोड्युसर आहे. तिनं 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की' यांसारख्या मालिकांनी टेलिव्हिजनच्या परिभाषाच बदलून टाकल्या. ‘द डर्टी पिक्चर’, ‘उड़ता पंजाब’ आणि अल्ट बालाजीच्या प्रोजेक्ट्समुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिच्या नावावर इंटरनॅशनल एमी पुरस्कार आणि पद्मश्रीसारखे प्रतिष्ठित सन्मान आहेत. एकता ही फक्त निर्माती नसून, भारतीय कंटेंटच्या सर्जनशीलतेची ओळख बनली आहे. ५०व्या वर्षीही ती नव्या कल्पनांबरोबर उत्साहानं काम करत आहे. ३० वर्षांहून अधिक काळ निर्मिती क्षेत्रात अफाट कामगिरी बजावणारी एकता कपूरनं ५०वा वाढदिवस ७ जूनला साजरा केला. आता यानिमित्तानं तिच्याशी खास गप्पा मारल्या आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी आणि जाणून घेतलं तिच्या यशस्वी प्रवासाविषयी आणि आगामी योजनांविषयी...
ईटीव्ही मराठी : एकता जी, ५०व्या वर्षी निर्माती म्हणून तुमचा ३० वर्षांचा प्रवास देखील पूर्ण होतोय. काय भावना आहेत?
एकता कपूर: हे खूप खास क्षण आहेत. जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा वाटतं की एका कथानकासारखाच हा प्रवास होता. चढ-उतार, संघर्ष, थरार आणि यश. पण मला थांबायचं नाही, मी अजूनही नव्या गोष्टी शिकते आहे आणि पुढचं पान लिहायचं बाकी आहे. खरं सांगायचं तर हे क्षण खूप भावनिक आहेत. ३० वर्षांपूर्वी मी एक साधं स्वप्न घेऊन या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज मागे वळून पाहताना वाटतं की प्रत्येक अनुभव, प्रत्येक चढ-उतारानं मला घडवलं. निर्मिती म्हणजे फक्त शो किंवा सिनेमा बनवणं नाही, तर लोकांच्या भावना, विचार आणि आयुष्याशी नातं जोडणं आहे. या प्रवासात मी खूप शिकले, बदलले आणि सतत काहीतरी नवीन निर्माण करत राहिले. आजही मी तेवढ्याच जोमानं आणि जिज्ञासेनं काम करते, कारण माझ्यासाठी निर्मिती हा एक ध्यास आहे, व्यवसाय नव्हे.
ईटीव्ही मराठी: आपण नेहमीच यशस्वी निर्मात्या म्हणून ओळखल्या जाता. कधी कॅमेऱ्यासमोर येण्याची इच्छा झाली नाही का?
एकता कपूर: नाही. मला नेहमी वाटलं की माझं काम आहे, कथा सांगणं आणि ते मी पडद्यामागे राहून अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. लोकांना माझं नाव पाहून कंटेंटवर विश्वास वाटतो, यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो?
ईटीव्ही मराठी: 'कसौटी जिंदगी की', 'क्योंकि सास भी कभी बहू थी' अशा मालिकांपासून अल्ट बालाजी सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंतचा प्रवास कसा होता?
एकता कपूर: हा प्रवास खूप रोमांचक आणि शिकवणारा ठरला. टेलिव्हिजनमधून माझी सुरुवात झाली आणि त्या माध्यमानं मला एक ओळख दिली, पण काळ बदलत गेला तसं माध्यमंही बदलत गेली. म्हणूनच अल्ट बालाजी सुरू करताना मला वाटलं की आता नवे विषय, नव्या शैलीत मांडण्याची वेळ आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मी अधिक बोल्ड, वास्तववादी आणि आजच्या पिढीला सुसंगत असं कंटेंट मांडू शकले. ‘लॉक अप’, ‘द मॅरिड वुमन’ यांसारख्या कथा जर टीव्हीवर सांगितल्या असत्या, तर त्यांना तितकीशी मोकळीक मिळाली नसती. म्हणूनच हा प्रवास म्हणजे केवळ माध्यमांचा बदल नव्हे, तर माझ्या विचारसरणीचा आणि सर्जनशीलतेचा विस्तार होता. ओटीटी हे केवळ एक माध्यम नाही, तर एक क्रांती आहे.


ईटीव्ही मराठी: इंटरनॅशनल एमी अवॉर्ड आणि पद्मश्री हे पुरस्कार यांचे तुमच्या जीवनात किती महत्व आहे?
एकता कपूर: हे सन्मान केवळ माझे नाहीत, तर त्या साऱ्या टीम्सचे आहेत, ज्यांनी माझ्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणलं. इंटरनॅशनल एमी मिळाल्यानंतर जगात भारतीय कंटेंटची ताकद अधोरेखित झाली, आणि पद्मश्री म्हणजे भारत सरकारनं माझ्या कामाला दिलेली शाबासकी. हे दोन्ही पुरस्कार माझ्यासाठी केवळ वैयक्तिक यश नाहीत, तर माझ्या टीमच्या कष्टांची, माझ्या प्रवासातील प्रत्येक टप्प्याची आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पोचपावती आहेत. इंटरनॅशनल एमी मिळालं, तेव्हा जाणवलं की भारतीय कथा आता जागतिक पातळीवर ऐकल्या जात आहेत. आणि पद्मश्रीसारखा राष्ट्रीय सन्मान म्हणजे माझ्या देशानं माझ्या कामावर ठेवलेला विश्वास. या सन्मानांनी मला अधिक जबाबदारीची जाणीव करून दिली आहे की अजून अधिक सच्च्या, अर्थपूर्ण आणि लोकांच्या मनाला भिडणाऱ्या कथा मला सांगायच्या आहेत.
ईटीव्ही मराठी: एकता कपूरकडून प्रेक्षकांना नजीकच्या काळात काय बघायला मिळणार आहे?
एकता कपूर: काही भन्नाट वेब सीरीज, फीमेल-ड्रिवन फिल्म्स आणि जुन्या लोकप्रिय फ्रँचायझींचे नव्यानं पुनरागमन. मी प्रेक्षकांसाठी नेहमीप्रमाणे काहीतरी हटके घेऊन येतेय. माझं लक्ष आता अशा कंटेंटवर आहे, जो लोकांना विचार करायला लावेल आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवायला प्रेरित करेल.
ईटीव्ही मराठी: तुम्ही ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ मध्ये स्मृती इराणीला घेतलंय, त्याबद्दल काही सांगा.....
एकता कपूर: माझ्या मते ‘सास भी कभी बहू थी २’ साठी स्मृती इराणीच योग्य चेहरा आहे. ती तुलसीच्या भूमिकेसाठी आजही सर्वात योग्य अभिनेत्री आहे. ती केवळ एक पात्र नव्हती, तर अनेक घरांमधल्या मुलींसाठी एक आदर्श होती. स्मृतीनं ‘तुलसी’ या भूमिकेला, ज्या प्रकारे आत्मसात केलं, ते अपवादात्मक होतं. जरी आज ती एक जबाबदार केंद्रीय मंत्री असली, तरी प्रेक्षकांच्या मनात तिची ‘तुलसी’ म्हणून असलेली ओळख अजूनही ताजी आहे. जर स्मृतीनं वेळ काढून हा नवा सीझन केला, तर ते प्रेक्षकांसाठी एक मोठं सेलिब्रेशन ठरेल. तिचं कमबॅक हा टीव्ही इतिहासातील एक मेमरेबल क्षण ठरेल. मला वाटतं की, क्लासिक पात्रांना परत आणताना, मूळ कलाकारच असतील तर त्याचं भावनिक वजन अधिक ठरते आणि स्मृती इराणीनं ‘तुलसी’मध्ये जे जिवंतपण आणलं होतं, ते अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
एकता कपूर स्वतःच्या हिमतीवर इंडियन एंटरटेनमेंटचं सर्वोच्च ब्रँड बनलेली निर्माती आहे. भारतीय टेलिव्हिजन, सिनेमा आणि डिजिटल विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवणारी एकता कपूर ७ जूनला आपला ५०वा वाढदिवस साजरा केला आहे. हे यंदाचं वर्ष तिच्यासाठी खास ठरत आहे कारण ती निर्माती म्हणून आपल्या तीन दशकांच्या यशस्वी प्रवासाचा सोहळा साजरा करत आहे.
हेही वाचा :
- 'गंदी बात'मध्ये अल्पवयीन मुलींची अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी एकता आणि शोभा कपूरविरोधात तक्रार दाखल
- करण जोहरची नक्कल केल्यानंतर कॉमेडियन केतन सिंगनं मागितली माफी, एकता कपूरनं केलं समर्थन - Karan johar ekta kapoor
- उर्फी जावेद स्टारर 'लव्ह सेक्स और धोखा 2'चा टीझर प्रदर्शित - love sex aur dhokha 2 teaser