मुंबई - सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य ऐतिहासिक मालिका ४ जूनपासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पृथ्वीराज चौहान यांचा निरागस राजकुमार ते धाडसी आणि दूरदृष्टी असलेल्या सम्राटापर्यंतचा प्रवास या मालिकेत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेता रोनित बोस रॉय राजा सोमेश्वर म्हणजे पृथ्वीराज चौहान यांचे वडील यांची भूमिका साकारत आहेत. आपल्या गहन अभिनयशैलीसाठी प्रसिद्ध असलेले रोनित रॉय यांनी या भूमिकेसाठी जबरदस्त शारीरिक बदल केला आहे. तब्बल ८ किलो वजन कमी करत त्यांनी एका राजाची ताकद, शिस्त आणि दिव्यता आत्मसात केली आहे. आता याबद्दल आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी त्यांनी त्यांच्या सशक्त भूमिकेबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत.
ईटीव्ही मराठी : ‘राजा सोमेश्वर’ ही भूमिका स्वीकारताना आपली तयारी कशी होती?
रोनित रॉय: अशा थोर आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारायची असेल, तर फक्त त्याची मानसिक जडणघडण समजून घेणं पुरेसं नसतं. त्याच्या देहबोलीतही उतरावं लागतं. राजा सोमेश्वर सारखी भूमिका साकारण्यासाठी फक्त मानसिक नव्हे, तर शारीरिक तयारीही करणे गरजेचे होते. त्यामुळे मी शारीरिकदृष्ट्या बदल करण्याचे ठरवले. दोन महिन्यांच्या कालावधीत मी ८ किलो वजन कमी केलं. सकाळी स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि संध्याकाळी कार्डिओ अशी कडक व्यायामशैली माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला होता.
ईटीव्ही मराठी : या भूमिकेसाठी तुम्ही काही विशेष प्रशिक्षण घेतलं का?
रोनित रॉय : हो, मी मार्शल आर्ट्स आणि लाठी-काठी युद्धकलेचं प्रशिक्षण घेतलं. हे फक्त युद्धासाठी नव्हतं तर एका योद्ध्याचा आत्मा समजून घेण्यासाठी होतं. हे सराव म्हणजे एक प्रकारचं ध्यान होतं. यातून मला राजा सोमेश्वरची आंतरिक ताकद आणि भूमिकेची गहिराई उमगली.
ईटीव्ही मराठी: ही प्रक्रिया तुम्हाला वैयक्तिक पातळीवर कशी वाटली?
रोनित रॉय : ही प्रक्रिया खूपच कष्टप्रद होती, थकवादायक होती परंतु त्याचबरोबर आत्मिक समाधान देणारी होती. राजा फक्त दिसायला राजा नको, तर त्याच्या प्रत्येक सीनमध्ये तो जगायला हवा, असे माझे मत आहे. मला वाटतं मी त्यात यशस्वी झालो आहे. प्रेक्षकांना हा अभिमान आणि शक्ती नक्कीच जाणवेल.
ईटीव्ही मराठी : या ऐतिहासिक मालिकेचे आजच्या काळातील महत्व काय आहे?
रोनित रॉय : आपण असे म्हणू शकतो की ही राष्ट्रप्रेमाची जिवंत कहाणी आहे. पृथ्वीराज चौहान यांचा जीवनप्रवास म्हणजे एका तरुण राजकुमाराचा राष्ट्रासाठी झगडणाऱ्या पराक्रमी योद्ध्यापर्यंतचा प्रवास. लहान वयातच सिंहासनावर विराजमान झालेले पृथ्वीराज आपल्या प्रजेच्या आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी सदैव तत्पर होते. ‘शौर्य सर्वपूज्यते, राष्ट्रमेव जयते’ हा मंत्र या मालिकेच्या प्रत्येक प्रसंगातून प्रकट होतो. ही मालिका प्रेक्षकांना भारताच्या इतिहासातील एका थोर सम्राटाच्या प्रेरणादायक प्रवासाची अनुभवसंपन्नता देईल.
ईटीव्ही मराठी : तुमच्याबरोबर अत्युत्तम कलाकारांची फळी आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल?
रोनित रॉय : हो. आमच्याकडे तगडी कलाकारांची फौज आहे. उर्वा सवालिया याने लहान पृथ्वीराजची भूमिका तडफदारतेनं साकारली आहे. मी राजा सोमेश्वरच्या रूपात दिसणार आहे. ही एक वजनदार आणि गडद भूमिका आहे. पद्मिनी कोल्हापुरे शहाणी आणि प्रभावशाली राजमाता म्हणून चमकतात तर अनुजा साठे कर्पूरा देवीच्या भुमिकेत तेजस्वी वाटतात. आशुतोष राणा यांनी कवी चंद बरदाईचा विचारशील आणि गांभीर्यपूर्ण चेहरा दाखवला आहे. मोहम्मद घोरीच्या भूमिकेत अविनेश रेखीनं विलक्षण प्रभाव टाकला आहे. ते प्रेक्षकाच्या अंगावर काटा आणतील.
ईटीव्ही मराठी: ऐतिहासिक मालिकांची निर्मितीमूल्ये प्रभावी असावी लागतात. या मालिकेबद्दल ते लागू पडते का?
रोनित रॉय : अर्थातच. ‘भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप’ सारख्या ऐतिहासिक मालिकांची निर्मिती करणाऱ्या कोन्तीलो पिक्चर्स (Contiloe Pictures) नं या मालिकेची निर्मिती केली आहे. इतिहासाची सखोल समज, प्रामाणिक कथा मांडणी आणि उच्च निर्मिती मूल्य ही त्यांची खासियत आहे, ज्यामुळे ही मालिका अधिक भव्य आणि विश्वासार्ह वाटते. मालिकेत पृथ्वीराज चौहान विरुद्ध मोहम्मद घोरी यांच्यातील इतिहासातील निर्णायक संघर्ष दाखविण्यात आला आहे, जो अतिभव्यतेनं चित्रित करण्यात आला आहे. त्या लढ्याच्या युद्धनीती, भावनिक गुंतवणूक आणि ऐतिहासिक वळणांचा प्रभावी अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी कुठेही ऍडजस्टमेन्ट न करता मालिका किती अस्सल होईल याकडे प्रामाणिकतेनं लक्ष दिलं आहे.
हेही वाचा :