मुंबई - वाणी कपूर ही यशराजची हिरॉईन म्हणून ओळखली जाते. 'बेफिक्रे'मध्ये तिची रणवीर सिंगबरोबर जोडी जमली होती. त्यानंतर ती 'चंदिगढ करे आशिकी'मध्ये आयुष्मान खुरानाची तर 'शमशेरा'मध्ये रणबीर कपूरची नायिका म्हणून झळकली होती. आता तिची प्रमुख भूमिका असलेला 'रेड २' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे, ज्यात तिची वर्णी अजय देवगणबरोबर लागली आहे. 'रेड २' हा गाजलेल्या 'रेड' या चित्रपटाच्या फ्रँचायझीचा भाग आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करत आहे. अजय देवगण चित्रपटात अमय पटनायक या करारी आयआरएस ऑफिसरची भूमिकेत पुनरागमन करत असून, त्यांच्याविरोधात उभा आहे खलनायक दादाभाई, म्हणजेच रितेश देशमुख असेल. या दोघांमधील टोकाचा संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेले 'कमले' हे प्रेमगीत अजय देवगण आणि वाणी कपूर यांच्यातील गोड नातं उलगडून दाखवतं. वाणी कपूरनं आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत संवाद साधला आणि जाणून घेतलं तिने अनुभवलेल्या 'रेड २'च्या प्रवासाविषयी.... त्यातील काही निवडक अंश.
ईटीव्ही भारत - 'रेड २'मध्ये अजय देवगणबरोबरचा काम करण्याचा अनुभव कसा होता?
वाणी कपूर : अजय सर यांनी सुरुवातीलाच हास्यविनोद करून वातावरण मोकळं केलं. त्यामुळे त्यांच्याबरोबर सीन्स करताना अजिबात दडपण आलं नाही. अजय सर म्हणजे एक चालतं बोलतं पॉवरहाऊस आहे. त्यांच्या अभिनयात एक जादू आहे. ते स्क्रीनवर येतात आणि सर्व लक्ष आपल्या अभिनयाकडे खेचून घेतात. त्यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी त्यांना नेहमीच आदरानं पाहिलं आहे. देशातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्यासोबत एका मोठ्या फ्रँचायझीचा भाग होणं, ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. हे एक स्वप्न साकार झाल्यासारखं वाटतं. ते नम्रतेचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. जमिनीवर पाय असलेले, मनमिळावू, उदार आणि खूपच सौम्य स्वभावाचे. त्यांचा नम्र आणि विनयशील स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची दाखवतो. मी स्वभावानं थोडी अंतर्मुख आहे, पण अजय सरांच्या सहज आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे मला एकदम आरामदायक वाटलं. त्यांनी वातावरण इतकं प्रसन्न केलं की अगदी साध्या प्रश्नांनाही ते इतक्या सहजतेनं आणि गोडीत उत्तर देत होते की, संवाद खूप आनंददायी ठरला.
ईटीव्ही भारत - रितेश देशमुख यांच्यासोबत तुम्ही पहिल्यांदाच काम करीत आहात.....
वाणी कपूर : खरं सांगायचं रितेश देशमुख अफाट प्रतिभेचा धनी आहे. त्याच्यासोबत काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणी होती. रितेश देशमुखला एका खलनायकाच्या रूपात पाहणं खूपच रोमांचक आहे. तो एक जबरदस्त आणि भ्रष्ट राजकारणी या भूमिकेत ज्या प्रकारे रंगतो, ती तीव्रता पाहण्यासारखी आहे. रितेश देशमुख यांनी 'रेड २'मध्ये साकारलेली नकारात्मक व्यक्तिरेखा प्रचंड प्रभावी आहे. एक शक्तिशाली, भ्रष्ट राजकारणी म्हणून त्यांनी जी तीव्रता आणि उग्रता दाखवली आहे, ती पाहणं एक चांगला अनुभव आहे. प्रेक्षकांनी त्यांना मुख्यतः विनोदी किंवा हलक्याफुलक्या भूमिकांमध्ये पाहिलंय, पण या चित्रपटात ते एक वेगळंच रूप साकारत आहेत, जे जबरदस्त आहे. त्यांच्या अभिनयातील परिपक्वता आणि ताकद यातून त्यांच्या भूमिकेला एक वेगळीच धार मिळाली आहे. रितेशचा हा नव्या रूपातला अभिनय प्रेक्षकांसाठी एक सरप्राइज पॅकेज ठरेल.
ईटीव्ही भारत - दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्याबद्दल काय सांगाल?
वाणी कपूर : राजकुमार गुप्ता सर हे खूपच संवेदनशील, स्पष्टदर्शी आणि प्रतिभावान दिग्दर्शक आहेत. कलाकारांवर त्यांचा विश्वास असतो आणि त्यामुळे सेटवर एक खूप सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण तयार होतं. त्यांनी प्रत्येक सीनमध्ये इतकी बारकाईनं तयारी केली होती की, आमच्यासाठी भूमिकेत शिरणं सहज शक्य झालं. त्यांच्या दिग्दर्शनशैलीत एक प्रकारचा संयम आणि स्पष्टता आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला सन्मान दिला आणि आमच्यातून सर्वोत्तम अभिनय घडवून आणला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं म्हणजे एक समृद्ध अनुभव होता. 'रेड २'मध्ये ज्या प्रकारे एक कथा उलगडते आणि सामाजिक स्तरावर एक ठाम भूमिका मांडते, त्यामागे राजकुमार गुप्ता यांची कल्पकता आणि दृष्टिकोनच खऱ्या अर्थानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
ईटीव्ही भारत - 'रेड २'बाबत प्रेक्षकांना काय सांगाल?
वाणी कपूर : हा चित्रपट चांगल्या आणि वाईट यांच्यातील संघर्ष अधोरेखित करतो. कथा उत्कंठावर्धक आहे, पात्रं ताकदीची आहेत आणि संपूर्ण टीमनं खूप मेहनत घेतली आहे. आता फक्त प्रेक्षकांनी सिनेमागृहात येऊन हा अनुभव घ्यावा, एवढीच इच्छा आहे. 'रेड २'चे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले असून, या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्णन कुमार आहेत. चित्रपट टी-सीरिज आणि पॅनोरमा स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केला जात आहे. हा चित्रपट १ मे २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :