मुंबई - अभिनेत्री मोनालिसा, जिचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे, भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिनं १०० हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी, बंगाली, ओडिया आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिने प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. मोनालिसानं केवळ चित्रपटांतच नाही तर छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहेत. ‘नजर’ या अलौकिक मालिकेत तिनं हडळ साकारत घवघवीत यश मिळवलं. तिचा ग्लॅमरस लूक, आत्मविश्वासपूर्ण अभिनय आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्व यामुळे ती प्रेक्षकांची आवडती बनली. अभिनयातील प्रयोगशीलतेमुळं मोनालिसा सतत चर्चेत असते. 'जुड़वा जाल' या ओटीटी वेब सीरीजमध्ये ती दुहेरी भूमिका साकारत असून मोनालिसानं त्यासंदर्भात आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तिच्या भूमिकेची तयारी, अनुभव आणि आव्हानांबद्दल उलगडून सांगितलं.
ईटीव्ही मराठी: ‘जुडवा जाल’ या मालिकेतील तुझ्या भूमिकेबाबत थोडं सांगशील का?
मोनालिसा : या मालिकेत मी द्विदल भूमिका साकारत असून, गूढ आणि भावनिक कथानकातून एक भयंकर रहस्य उलगडते. मी अनामिका आणि तिची बहिण शुची या दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. या दोघी बहिणी एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न स्वभावाच्या आहेत. अनामिका गूढ आणि रहस्यमय सावल्यांनी व्यापलेली आहे, तर शुची ही न्यायप्रिय असून दुःखानं प्रवृत्त झालेली आहे. दोघींचा प्रवास गुंतागुंतीचा तसेच भावनिक आहे.



ईटीव्ही मराठी: दुहेरी भूमिका करणे कितपत आव्हानात्मक होतं?
मोनालिसा : खूपच आव्हानात्मक. कारण दोन्ही पात्रं एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. एकाच वेळी त्यांचं अंतर दाखवणं आणि तरीही त्यांच्यातली नाळ जपणं ही एक कसोटी होती. मी आरशासमोर उभं राहून संवादांचा सराव करत असे आणि दोन्ही भूमिकांत भिन्नता कशी असेल यावर विचार करीत असे. अर्थात मला दिग्दर्शिकेकडूनही खूप मदत झाली. या भूमिकांनी मला खूप काही शिकवलं, एक अभिनेत्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणूनही.
ईटीव्ही मराठी : या भूमिकांची तयारी कशी केली? कोणते संदर्भ वापरले?
मोनालिसा: मी ‘जुडवा’, ‘सीता और गीता’ आणि ‘चालबाज’ हे सिनेमे पुन्हा पाहिले. या सिनेमांमधील दुहेरी भूमिका नेमक्या कशा रचल्या आहेत हे बारकाईनं बघितलं. पात्रांमध्ये असलेलं भावनिक अंतर कसं दाखवलं जातं याचा अभ्यास केला. अभिनयात ती समांतरता आणि विरोधाभास योग्य प्रमाणात असणं गरजेचं होतं. दोन्ही भूमिका साकारताना पात्रांची देहबोली, संवादफेक, वस्त्रपरिधानं आदी गोष्टींवर बरीच मेहनत घेतली.
ईटीव्ही मराठी: या परस्परविरोधी भूमिका साकारताना कुठली आव्हानं होती?
मोनालिसा: अर्थात यात सर्वात मोठं होतं ते म्हणजे दोन्ही परस्परविरोधी व्यक्तिरेखांमधील भावनिक नाळ. एका रात्रीच्या घटनेभोवती फिरणाऱ्या या कथेतील रहस्य, प्रेम आणि फसवणुकीच्या गुंत्यातून वाट काढणं हे दर्शविणे चॅलेंज होतं. तसेच शुचीच्या मनातील गोंधळ दाखविणे आणि अनामिकेच्या गूढतेला वास्तविकता प्रदान करणं आव्हानात्मक होतं. दोन्ही भूमिका साकारताना मला त्यांच्यातील मानसिकतेमध्ये खूप खोलवर जावं लागलं. एकटेपणा, संशय, आणि सत्य उलगडण्याची धडपड हे सगळं मी स्वतः अनुभवायचा प्रयत्न केला.
ईटीव्ही मराठी: 'जुड़वा जाल’ मधील तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील?
मोनालिसा: ‘जुड़वा जाल’मध्ये काम करताना मला माझे सहकलाकार अनिकेत भाटिया, पलक सिंग आणि इतर सर्व कलाकारांबरोबर खूप छान अनुभव आला. प्रत्येक कलाकारानं आपल्या भूमिकेला दिलेला न्याय आणि सेटवरचं सकारात्मक वातावरण खूप प्रेरणादायी होतं. अनिकेतनं एक परिपक्व अभिनेता म्हणून भूमिका साकारली, तर पलकची एनर्जी आणि समजूतदारपणा खूपच प्रशंसनीय होता. आम्ही एक टीम म्हणून खूप मस्त केमिस्ट्री शेअर केली, आणि त्यामुळे ही सस्पेन्सफुल वेब सीरीज आणखी प्रभावी झाली.
ईटीव्ही मराठी: प्रेक्षकांना या सीरीजबद्दल काय सांगशील?
मोनालिसा: ‘जुडवा जाल’ ही मालिका एक भावनिक झटका आहे. प्रत्येक पात्राच्या मागे एक रहस्य आहे. प्रेक्षकांनी प्रत्येक दृश्य लक्षपूर्वक पाहावं, कारण कोणतीही गोष्ट उगाचच दाखविली गेलेली नाहीये. जशी ती दिसते तशी ती असेलच असे नाही. प्रेम, फसवणूक आणि खून यांच्या गुंतागुंतीतली ही कहाणी प्रत्येक ट्विस्टसह तुमचे लक्ष वेधून घेत ही मालिका तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, याची मला खात्री आहे. दरम्यान ‘जुडवा जाल’ १२ जून २०२५ पासून हंगामा ओटीटी आणि पार्टनर प्लॅटफॉर्म्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.