मुंबई - मराठी चित्रपटांना म्हणावा तसा प्रेक्षक पाठिंबा मिळत नाही, अशी ओरड सुरु असतानाच मराठी नाटकांना मात्र प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. तसं पाहिलं तर मराठी प्रेक्षक हा नाट्यवेडा म्हणून ओळखला जातो आणि तो अतिशय चोखंदळ सुद्धा आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच सध्या अनेक जुनी गाजलेली नाटकं पुनरुज्जीवित होताहेत तसेच विविधांगी विषयावरील नवीन नाटकं रंगभूमीवर सादर केली जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे 'तोडी मिल फँटसी.' सृजनशील युवा कलावंतांची कथा 'तोडी मिल फँटसी' या रॉक म्युझिकल नाटकाच्या निमित्ताने रसिकांपुढे येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीनं या नाटकाची निर्मिती केली असून त्यासंदर्भात त्यानं आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यानं, रंगभूमीवर पुन्हा एकदा येण्याच्या इच्छेबाबत, नव्या पिढीच्या कलावंतांना पाठिंबा देण्याबाबत, दिलखुलासपणे मत व्यक्त केलं.
ईटीव्ही भारत - 'तोडी मिल फँटसी' या नाटकाला सहकार्य करण्यामागचं तुमचं मुख्य कारण काय?
अंकुश चौधरी : 'ऑल द बेस्ट' या माझ्या एकांकिकेचं व्यावसायिक नाटक झालं, त्यावेळी चंद्रकांत कुलकर्णी आणि महेश मांजरेकर या दोघांनी दाखवलेला विश्वास खूप महत्त्वाचा होता. त्यांच्या पाठिंब्यामुळेच ते शक्य झालं. आता माझ्या पिढीनंतर आलेल्या, काहीतरी वेगळं करण्याची धडपड असलेल्या नव्या कलाकारांना मी काय देऊ शकतो, हे मनात आलं. वाटलं की आपण नवे असताना आपल्यावर कुणीतरी विश्वास दाखविला, तर आपणही या नवीन मुलांना सहकार्य नक्कीच करू शकतो. 'तोडी मिल फँटसी'साठी माझं हेच तत्त्व लागू झालं.

ईटीव्ही भारत - तुम्हाला सुद्धा 'तोडी मिल फँटसी’ सारखं ब्रॉडवे स्टाइलचं नाटक करायचं आहे. त्यामागे नेमकं काय स्वप्न आहे?
अंकुश चौधरी : 'तोडी मिल फँटसी' पाहून मला वाटतं की आपल्याकडेही उच्च दर्जाचं ब्रॉडवे नाटक तयार होऊ शकतं. असं नाटक जे जगभरात एकाच दिवशी अनेक ठिकाणी सादर होईल, त्यात संगीत, नृत्य, संवाद, सगळं काही असेल. अशा प्रकारचं नाटक करायची माझी खूप इच्छा आहे. तसेच चंद्रकांत कुलकर्णी असं काही घेऊन आले तर मी रंगभूमीवर नक्कीच पुनरागमन करेन.

ईटीव्ही भारत - 'तोडी मिल फँटसी'च्या कथानकाबद्दल थोडं काही सांगा.....
अंकुश चौधरी : या नाटकात मुंबईच्या गिरण्यांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या, घंट्या, अम्या आणि शिऱ्या या तीन मित्रांची कथा आहे. गिरणगाव आता मॉल्स आणि पब्सनी व्यापलं आहे. गिरणी कामगारांची पिढी हाऊसकिपिंग करत आहे, पण या झगमगाटामागे एक फँटसी दडलेली आहे. ती फँटसीच या नाटकाचं मूळ आहे.

ईटीव्ही भारत - या नाटकाला मजबूत संगीतमय बाजू आहे. त्याबद्दल काही सांगाल?
अंकुश चौधरी : संगीत या नाटकातील एक कॅरॅक्टर आहे असे म्हणता येईल. या नाटकात रॅप, रॉक, मेटल, रेगे, कव्वाली अशा संगीतप्रकारांचा संगम आहे. देसी रिफ, अगस्ती परब आणि कपिल रेडेकर यांचं संगीत या नाटकाला मिळालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक एक संगीतात्मक अनुभव देईल.

ईटीव्ही भारत - कोणकोणते कलाकार आहेत यात?
अंकुश चौधरी : शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके, जयदीप मराठे, श्रीनाथ म्हात्रे, सुरज कोकरे हे कलाकार या नाटकात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

ईटीव्ही भारत - या नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल काही सांगाल का?
अंकुश चौधरी : याची पूर्ण नाट्यप्रक्रिया पुण्यात झाली आहे. प्रकाशयोजना राहुल जोगळेकर आणि सचिन दूनाखे यांनी केली आहे. वेशभूषा शुभांगी सूर्यवंशी आणि परीजा शिंदे यांची आहे, तर रंगभूषा प्रदीप दरणे यांची. नृत्यदिग्दर्शन अक्षय मांडे यांचं आहे. 'तोडी मिल फँटसी' फक्त नाटक नाही, तर एक अनुभव आहे. आणि असं नाटक घडवणाऱ्या युवा कलाकारांसाठी माझा कायम पाठींबा आहे.