मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणाच्या रणधुमाळीत ज्या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली तो चित्रपट म्हणजे 'धर्मवीर'. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. आनंद दिघे हे नाव उच्चारलं की लोकांच्या, खासकरून ठाणेवासीयांच्या, मनात आदराची भावना तयार होते. त्यांचा ठसा इतका खोल आहे की तो फक्त आठवणीत नाही, तर प्रत्येक श्रद्धावानाच्या अंत:करणात कायमचा कोरला गेलाय. त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट जेव्हा मोठ्या पडद्यावर आला, आणि प्रेक्षकांनी त्याचं स्वागत केलं होतं.
पहिल्या भागाच्या शेवटी 'धर्मवीर'चा दुसरा भाग येणार हे घोषित झालं होतं. प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली उभा राहिलेला 'धर्मवीर २' हा चित्रपट केवळ दृश्यांचा संग्रह नाही, तर तो काळ, त्या भावना, आणि त्या नेतृत्वाचा प्रभाव यांचं चित्ररूप दर्शन आहे. महेश लिमये यांचं भव्यदिव्य छायाचित्रण, अविनाश-विश्वजीत आणि चिनार-महेश यांच्या सुरेल संगीतरचनेने हा प्रवास अधिक प्रभावी बनतो. 'हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून, तो एक अनुभव आहे, मनाला भिडणारा, डोळ्यांत पाणी आणणारा आणि मनात विचारांची एक लहर उठवणारा', अशा प्रतिक्रिया समीक्षक आणि प्रेक्षकांकहून मिळाल्या होत्या.
"जवळपास वीसेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काम केल्यावर मला प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळालेला पहिला चित्रपट म्हणजे 'धर्मवीर'", अशा भावना प्रसाद ओक यांनी व्यक्त केल्या होत्या. 'प्रसाद ओक यांनी साकारलेला आनंद दिघे हा केवळ अभिनय नव्हे, तर एक जिवंत अनुभूती आहे. त्यांच्या अभिनयातून दिसते ती त्या व्यक्तिमत्वाविषयीची निष्ठा आणि समर्पण' अशी शाबासकी त्यांच्या अभिनयाला मिळाली होती. या सिक्वेल मधून प्रसाद ओक सोबत क्षितीश दाते, मकरंद पाध्ये, स्नेहल तरडे आणि देवेंद्र गायकवाड यांनी आपल्या भूमिकांमध्ये खरी जिवंतता आणली.
एका धडाडीच्या नेत्याचा अमर प्रवास असलेला 'धर्मवीर २’ आता छोट्या पडद्यावरदेखील अनुभवायला मिळणार आहे. १८ मे, रविवारी, दुपारी आणि संध्याकाळी हा चित्रपट झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.