मुंबई - विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' या चित्रपटाला रिलीज होऊन २ महिने झाले आहेत आणि अजूनही हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्शित करत आहे. या कालावधीत अनेक चित्रपट रिलीज झाले आणि थिएटरमधून उतरले परंतु 'छावा'ची जादू अजूनही संपलेली नाही. लक्ष्मण उत्तेकरांचा हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला आहे की, ओटीटीवर प्रदर्शित होऊनही लोक तो चित्रपटगृहात येऊन पाहात आहेत. आतापर्यंत या चित्रपटानं ६०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी, 'पुष्पा २' आणि 'स्त्री २' नं हिंदी पट्ट्यात हा आकडा ओलांडला होता.
६०० कोटींची कमाई करणारा पहिला नॉन-सीक्वल चित्रपट 'छावा' - विकी कौशल स्टारर 'छावा' हा हिंदी पट्ट्यात बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा आकडा पार करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी इतकी कमाई करणारे 'पुष्पा २' आणि ''स्त्री २ हे दोन्ही चित्रपट सीक्वेल होते. अगोदरच्या पहिल्या भागातील प्रसिद्धीचा त्यांना लाभ झाला होता. मात्र 'छावा' हा पहिला ऩॉन सीक्वेल चित्रपट हा टप्पा गाठू शकला आहे. 'पुष्पा २' नं हिंदीमध्ये ८१२.१४ कोटी रुपये आणि 'स्त्री २' नं ६२७.५० कोटी रुपये कमावले होते. छावाची कमाई आता ६००.०१ कोटी झाली आहे.
हा विक्रम शेअर करताना चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी लिहिलंय की, '६०० नॉट आऊट... छावानं ६०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे... पुष्पा २ (हिंदी) आणि स्त्री २ नंतर, 'छावा' हा विक्रम करणारा तिसरा ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपट बनला आहे... '
'छावा'च्या एकूण कमाईवर एक नजर
- पहिला आठवडा: - २२५.२८ कोटी
- दुसरा आठवडा: - १८६.१८ कोटी
- आठवडा ३: - ८४.९४ कोटी
- आठवडा ४: - ४३.९८ कोटी
- आठवडा ५: - ३१.०२ कोटी
- आठवडा ६: - १५.६० कोटी
- आठवडा ७: - ७ कोटी
- आठवडा ८: - ३.५० कोटी
- आठवडा ९: - २.३० कोटी
- वीकेंड १०: - ३० लाख
- एकूण: - ६००.१० कोटी
विकी कौशलच्या वडिलांनी मानले चाहत्यांचे आभार - विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. दरम्यान, छावा चित्रपटानं जगभरात जवळपास ८०० कोटींची कमाई केली आहे.
'छावा' चित्रपटामध्ये विक्की कौशलनं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. यामध्ये रश्मिका मंदान्नानं संभाजी राजेंची पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्ना यात औरंगजेबच्या भूमिकेत दिसला, याशिवाय आशुतोष राणा, विनीत कुमार, दिव्या दत्ता, डायना पेंटी हे चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जगभरात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी झाला.
हेही वाचा -