मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. 'भाईजान'ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीनं धमकी पाठवली आहे. आता पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सलमान खानला सतत जीवे मारण्याची धमक्या मिळत असल्यानं मुंबई पोलीस खूप सर्तक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती थोडी शांत होती. मात्र वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर सलमानला त्याच्या घरात घुसून मारेल, अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय त्याची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकीही दिली गेली आहे.
पोलीस अधिकारी डीसीपी डी.व्ही. कांबळे यांनी दिली माहिती : या प्रकरणात सलमान खानला आलेल्या धमकीच्या अनुषंगानं वरळी पोलीस स्थानकात कलम ११८/२५ दंड संहिता ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरळी पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त डी. व्ही. कांबळे यांनी दिली आहे. सलमानच्या सुरक्षेत यापूर्वीच वाढ करण्यात आली आहे. सुरक्षिततेचा भाग म्हणून गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा पूर्ण भाग बुलेटप्रूफ काचेनं संरक्षित करण्यात आला आहे. तसेच घरातील खिडक्या आणि दरवाजांवर देखील बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहेत. सध्या सलमान खानला महाराष्ट्र सरकार तर्फे वाय प्लस कॅटेगरीमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अकरा जवान सोबत राहतात. सलमान खानच्या ताफ्यामध्ये दोन एस्कॉर्ट गाड्या आहे. त्याची गाडी देखील पूर्णतः बुलेटप्रूफ आहे.
सलमान खानला मिळाली पुन्हा जीवे मारण्याची धमकी : लॉरेन्स बिश्नोई बऱ्याच काळापासून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत आहे. याआधी देखील सलमानच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात सलमानच्या घराच्या भिंतीलाही एक गोळी लागली होती. तसेच भाईजानच्या घरावर एक गोळी लागली आणि जाळी फाडून गेली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून तिथून पळून गेले. तपासादरम्यान, गोळीबाराची जबाबदारी घेणारी एक फेसबुक पोस्ट यानंतर समोर आली होती. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही पोस्ट तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईनं केली होती.
बाबा सिद्दीकीची हत्या : याप्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली होती. सलमान खानला अनेकदा मेलद्वारे देखील जीवे मारण्याची धमक्या दिल्या गेल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला मारेल असं देखील अनेकवेळा म्हटलं आहे. तसेच सलमान खानचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकीची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. यानंतर सलमान खानला खूप दु:ख झालं होतं. दरम्यान पुन्हा एकदा त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानं सलमानचे चाहते देखील नारज आहेत. तसेच धमक्या मिळाल्यानंतर सलमान हा त्याचं चित्रपटसृष्टीतील काम करत आहे. त्यानं काही दिवसापूर्वी त्याचा चित्रपट 'सिकंदर' देखील शूटिंग केलं होतं. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे.
हेही वाचा :