मुंबई : दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली: द कन्क्लुजन'च्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त, चित्रपटाचे निर्माते शोबू यारलागड्डा यांनी 'बाहुबली' पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा पहिला भाग २०१५मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित करण्यात आला होता, तर दुसरा भाग २०१७ मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता. २०२५ मध्ये, पहिल्या भागाचा १०वा आणि दुसऱ्या भागाचा ८वा वर्धापन दिन आहे. म्हणूनच निर्मात्यांनी चाहत्यांना एक मेजवानी देण्याचा निर्णय घेतला आहे. 'बाहुबली 2'चा आठवा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात आला.
'बाहुबली'पुन्हा कधी प्रदर्शित होणार? : निर्माते शोबू यांनी या खास प्रसंगी एका पोस्टमध्ये लिहिलं, 'या खास दिवशी, मला तुम्हाला सर्वांना कळवण्यास आनंद होत आहे की, आम्ही यावर्षी ऑक्टोबरमध्ये 'बाहुबली' भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा प्रदर्शित करण्याची योजना आखत आहोत. हे फक्त पुन्हा रिलीज होणार नाही, तर आमच्या प्रिय चाहत्यांसाठी हे वर्ष उत्सवाचे असेल, या काळात जुन्या आठवणी, नवीन खुलासे आणि काही मोठे आश्चर्ये मिळतील अशी अपेक्षा आहे. संपर्कात रहा!' 'बाहुबली' ऑक्टोबर २०२५ मध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. एसएस राजामौली यांचा 'बाहुबली' हा एक भव्य चित्रपट होता.
'बाहुबली' चित्रपटाबद्दल : 'बाहुबली' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या दोन्ही चित्रपटांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर २,००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. २०२२ मध्ये, राजामौली यांनी या चित्रपटाबद्दल म्हटलं होत, "माझ्या कारकिर्दीत मी हे शिकलो आहे की भावना जितक्या तीव्र असतील, किंवा भावना जितक्या मूलभूत असतील तितक्या लोकांना तुमचा चित्रपट जास्त आवडेल. मी तेच करत आहे. जेव्हा मी पाहिले की 'बाहुबली' संपूर्ण देशाला आवडतो, तेव्हा मला जाणवले की जर चित्रपट मूलभूत मानवी भावनांनी प्रेरित कथांवर आधारित असतील, तर ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील." 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लुजन'मध्ये प्रभासनं मुख्य भूमिका साकारली होती, तर राणा दग्गुबतीनं भल्लालदेवाची भूमिका साकारली होती. याशिवाय अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, सत्यराज, नासिर यांसारखे अनेक प्रतिभावान कलाकार या चित्रपटामध्ये दिसले.
हेही वाचा :
- प्रभास स्टारर 'द राजा साब' चित्रपटामधील पोस्टर रिलीज, पोंगल आणि मकर संक्रांतीच्या निर्मात्यांनी दिल्या शुभेच्छा
- सलमान खानसारखाचं 'बिन लग्नाचा' आहे हा साऊथ सुपरस्टार, डेटिंगच्या अफवा पसरुनही आहे अविवाहित
- 'केजीएफ' आणि 'सालार'च्या निर्मात्यांनी प्रभासला 3 वर्षांसाठी केलं बुक, 3 चित्रपटांच्या रिलीज तारखाही ठरल्या