मुंबई - लोकांच्या जीवनात टेक्नॉलॉजीची व्याप्ती वाढत असून यामुळे अनेक कामं सुकर झाली आहेत. घरबसल्या बँक, बाजारहाट किंवा शॉपिंग करता येऊ शकते. लॅपटॉप अथवा मोबाईलच्या एका क्लिकवर ही सर्व कामे होत आहेत. परंतु त्याबरोबरच सायबर चोरांचे पेव वाढले आहेत. सामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या अनेक तक्रारी पोलिसांना मिळत आहेत. सायबर चोर निष्पाप लोकांना लुटतात. तसेच कधीकधी तर त्यातील काही लोक त्यांच्या आयुष्यभराची कमाई देखील घालवून बसतात. हे सर्व टेक्नॉलॉजीबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे घडत असते. पोलीसदल लोकांना सावधानतेचा इशारा देत असते, परंतु त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटी आयुष्मान खुराना याची मदत घेतली आहे.
सायबर जनजागृती : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आयुष्मानबरोबर भागीदारी केली आहे. या उपक्रमाचा उद्देश सायबर फसवणुकीचे प्रकार ओळखून नागरिकांना योग्य मार्गदर्शन देणे आणि त्यांना सजग बनवणे हा आहे. विशेषतः इंटरनेटचा नियमित वापर करणाऱ्या तरुणाईसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा संदेश उपयुक्त ठरेल. त्यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यातून सायबर धोके टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीचे मार्ग सांगितले गेले आहेत. या व्हिडिओत चेतावणी देत सांगितलं आहे की, डिजिटल दुनियेत हलगर्जीपणा केवळ माहितीच नाही, तर आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानही करू शकते.
आयुष्मान खुरानाचा व्हिडिओ आला समोर : सायबर जनजागृती मोहिमेसंदर्भात आयुष्मान म्हणाला की, "आपल्या डिजिटल आयुष्यात सुरक्षेला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं झालं आहे. सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस अधिक चतुर होत आहेत, त्यामुळे त्यांचा सामना करण्यासाठी आपल्यालाही सजग रहावं लागेल. मुंबई पोलिसांसारख्या विश्वासार्ह यंत्रणेसोबत काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. त्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी घेतलेलं हे डिजिटल पाऊल निश्चितच उल्लेखनीय आहे." दरम्यान सायबर गुन्हे थोपवण्यासाठी आयुष्मानबरोबर ऑनलाइन सावधगिरीचा वसा घ्या असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या सायबर हेल्पलाईन आणि जनजागृती उपक्रमामुळे शहरातील नागरिक अधिक सावध आणि जागरूक होतील, अशी अपेक्षा आयुष्मान व्यक्त केली आहे.
हेही वाचा :