मुंबई - आशुतोष गोवारीकर यांनी 'लगान', 'स्वदेस', 'जोधा अकबर' यांसारख्या दर्जेदार आणि आशयघन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. अभिनयातही त्यांनी आपली छाप पाडली असून त्यांच्या बहुआयामी प्रतिभेचं सिनेसृष्टीत नेहमीच कौतुक केलं जातं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मानवत मर्डर्स' मध्ये ते मध्यवर्ती भूमिकेत दिसले. आता ते रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
१९९९ च्या पार्श्वभूमीवर आधारित ‘एप्रिल मे ९९’ ही कथा हरवलेल्या नात्यांच्या, जुन्या आठवणींच्या आणि भावनांच्या गाठोड्यातून प्रेक्षकांना एका भावनिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये श्रीकांत खेडेकर आणि जाई खेडेकर या वडील-मुलीच्या नात्याचे अतूट बंध उलगडताना दिसतात. जुन्या लँडलाईन फोनवरून होणारा त्यांचा संवाद, नात्यांतील नाजूक भावना आणि काळजी दाखवणारी ती प्रेमळ बोलचाल हे सर्व एका हृदयस्पर्शी कथानकाची नांदी सांगतात.
रोहन मापुस्कर यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती मापुस्कर ब्रदर्स, फिंगरप्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स यांनी केली आहे. या सिनेमात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर आणि साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून, राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी आणि मॉरिस नून या निर्मात्यांबरोबर लॉरेन्स डिसोझा सहनिर्मात्याची भूमिका निभावत आहेत.

दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी 'व्हेन्टिलेटर' हा चित्रपट मराठीत बनवला होता आणि त्यातही अर्थातच आशुतोष गोवारीकरांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता राजेश मापुस्कारांचा भाऊ दिग्दर्शनात उतरल्यानंतर ‘एप्रिल मे ९९’ असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात गोवारीकर पुन्हा एकदा झळकणार आहेत. या सिनेमातून फिल्म कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं मोठं नाव असलेले रोहन मापुस्कर एका नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. या चित्रपटाच्या रिलीजचं काउंटडाऊन सुरू झालंय.
प्रेक्षकांच्या मनात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या गोड आठवणी जागवणारा ‘एप्रिल मे ९९’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
- पंतप्रधान मोदींचा फोटो असलेला नेकलेससह कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली रुची गुर्जर, तिच्या अॅक्सेसरीनं वेधलं सर्वांचं लक्ष
- निहार पालवे दिग्दर्शित सुपर ८ मिमी लघुपटाची प्रतिष्ठित स्ट्रेट ८ साठी निवड, कान्स फिल्म फेस्टीव्हलसह लंडनमध्ये होणार प्रीमियर
- प्रत्येक चित्रपटाबरोबर परिपक्व होत चाललेला ज्युनियर एनटीआर, स्क्रिन स्पेस शेअर करताना न घाबरणारा अभिनेता