पाकिस्तानी म्हटल्यावर जावेद अख्तर यांना आला राग, दिलं ट्रोल करणाऱ्याला प्रत्युत्तर...
१५ ऑगस्टच्या निमित्तानं जावेद अख्तर यांनी एक पोस्ट शेअर केली, यानंतर त्यांना ट्रोल केलं गेलं. आता त्यांनी ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला चांगलचं प्रत्युत्तर दिलंय.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 16, 2025 at 11:00 AM IST
|Updated : August 16, 2025 at 12:11 PM IST
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर हे आता वेगळ्या कारणामुळं चर्चेत आले आहेत. ते कोणत्याही मुद्द्यावर आपले उघडपणे मत व्यक्त करत असतात. याशिवाय त्यांना कुठली गोष्ट विचित्र वाटली तर ते थेट बोलून मोकळे होतात. त्यांच्या मतांमुळं आणि विधानांमुळं त्यांना अनेकजण ट्रोल करतात, मात्र ट्रोलर्सला कसे शांत करायचे हे देखील त्यांना चांगलेच माहित आहे. अलीकडेच, स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. प्रत्येक भारतीयाप्रमाणे त्यांनी आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी देशाच्या हुतात्मांचे स्मरण करताना देशातील जनतेला संदेशही दिला, मात्र त्यांना एका यूजर्सनं 'पाकिस्तानी' असल्याचं म्हटलं. यानंतर या व्यक्तीला जावेद अख्तरनं चांगलंच प्रत्युत्तर दिलं.
जावेद अख्तर यांची पोस्ट : जावेद अख्तर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त एक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, "माझ्या सर्व भारतीय बहिणी आणि भावांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. हे स्वातंत्र्य आपल्याला थाळीत भरून देण्यात आले नव्हते, हे आपण विसरू नये. आज आपण तुरुंगात गेलेल्या आणि आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी हुतात्मा झालेल्यांना आठवले पाहिजे आणि त्यांना सलाम केला पाहिजे. आपण ही मौल्यवान देणगी कधीही गमावू नये, याची खात्री करूया." यानंतर या पोस्टवर एका व्यक्तीनं अशी कमेंट केली की, 'तुमचा स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्टचा (पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन) आहे.' ही कमेंट पाहिल्यानंतर जावेद अख्तर यांना राग आला.

Happy Independence Day to all my Indian sisters and brothers . Let’s not forget this independence was not given to us on a platter . Today we must remember and salute those who Went to jails and those went to gallows for getting us Azaadi . Let’s see that we never lose this…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) August 15, 2025
जावेद अख्तर यांनी दिलं ट्रोल करणाऱ्याला उत्तर : त्यानंतर त्यांनी या व्यक्तीला कडक शब्दात उत्तर दिलं, "बेटा, जेव्हा तुझे वडील आणि आजोबा इंग्रजांचे बूट चाटत होते, तेव्हा माझ्या घरातील व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी 'काळ्या पाण्या'मध्ये मरत होते. आपल्या मर्यादेत राहा." दरम्यान 'काळं पाणी' म्हणजे अंदमान बेटांवर असलेल्या सेल्युलर जेल आहे, जे एका जंगलात आहे. या ठिकाणी ब्रिटिश राजवटीत स्वातंत्र्य सैनिकांना कठोर तुरुंगवास भोगावा लागत होता. दरम्यान जावेद अख्तर यांचे पणजोबा, फजल-ए-हक खैराबादी (१७९७-१८६१) हे एक प्रसिद्ध भारतीय इस्लामिक विद्वान, कवी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध उभे राहिले आणि १८५७ मध्ये भारतीय बंडाला पाठिंबा देणाऱ्या ब्रिटिश राजवटीविरुद्ध फतवा जारी केला. यामुळं त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमान बेटांवर पाठवण्यात आलं होतं. यानंतर त्यांचा तिथं मृत्यू झाला. तसेच जावेद अख्तर यांचे आजोबा मुज्तर खैराबादी आणि वडील जान निसार अख्तर हे देखील प्रसिद्ध कवी होते आणि त्यांनी ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला होता.
हेही वाचा :

