मुंबई - भारताच्या इतिहासातील एक काळी घटना म्हणजे जलियानवाला बाग हत्याकांड. जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करीत होते त्यावेळी त्यांनी केलेल्या क्रूर कृत्यांपैकी एक म्हणजे जलियानवाला बागेत जमलेल्या निशस्त्र लोकांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना. त्यावेळी जनरल डायर यानं जलियानवाला बागेत जमलेल्या निशस्त्र जमावावर, ज्यात कित्येक महिला आणि बालकं होती, बंदुकांच्या फैरी झाडल्या होत्या आणि हजारावर लोक मेले आणि त्याहून दुप्पट जखमी झाले होते. या निष्पाप लोकांवर केलेल्या निघृण हल्ल्यामुळं त्याची बदली करण्यात आली होती. त्याच्यावर केस टाकण्यात आली होती आणि भारतीय वकील शंकरन नायर यांनी भारतीय समाजाची बाजू मांडत इंग्रज न्यायाधीशांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्याची कहाणी असलेला चित्रपट येतोय ज्याचे नाव आहे 'केसरी २'.
'केसरी २' मध्ये सर चेट्टूर शंकरन नायर यांची भूमिका अक्षय कुमार साकारत आहे. इतिहासाची खरी जाणीव आणि हुतात्म्यांचा सन्मान राखणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. परंतु त्याला तुच्छ लेखणारी काही गोरी लोकं आजही आहेत. उदाहरणार्थ जनरल डायर यांची पणती. तिनं जलियानवाला बागमधील हुतात्म्यांना “लुटारू” असं संबोधले आहे आणि त्यावर तीव्र प्रतीक्रिया उमटल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यानं सुद्धा थेट उत्तर दिलं आहे. ‘केसरी’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेला अक्षय कुमारनं या विधानाचा तीव्र निषेध करत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यानं स्पष्ट केलं की जलियानवाला बाग हत्याकांड हे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत क्रूर आणि शोकांतिका घडलेलं पान आहे, जिथे निष्पाप नागरिक – महिला, मुले आणि वृद्ध – यांना ब्रिटीश सैन्यानं गोळ्यांनी मारून टाकलं होतं. अक्षय कुमारनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “ते लोक लुटारू नव्हते, तर स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणारे शांततामय आंदोलनकर्ते होते.” त्यानं या नरसंहाराच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या निंदेची आठवण करून दिली.
तसेच अक्षय कुमारनं 'केसरी २' च्या प्रोमोशन वेळी पंजाब मधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. एका कार्यक्रमात तो बोलला की, "एक दिवस असा येईल की जलियानवाला बाग हत्याकांडाबाबत ब्रिटिश एम्पायर सॉरी म्हणेल. केसरी २ बघून आणि इतर माहितीवरून त्यांना त्यांच्या चुकीची कल्पना येईल. जनरल डायर यांच्या पणतीनं जो 'लुटारू' शब्द वापरला आहे त्याचे उत्तर म्हणजे 'केसरी २'. तिनंदेखील हा चित्रपट पाहावा म्हणजे तिला कल्पना येईल की तिच्या पणजोबांनी काय क्रूरता केली होती. हा सिनेमा बघून तिचं नक्कीच मतपरिवर्तन होईल."
अक्षय कुमारने दिलेलं उत्तर ही केवळ एक प्रतिक्रिया नव्हे, तर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांचे स्मरण करून देणारा ठोस संदेश आहे. 'केसरी २' येत्या १८ एप्रिल ला प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा -