मुंबई - पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांना नुकतेच फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा निर्णय घेतला. ही बातमी समोर आल्यानंतर जनरल असीम मुनीर यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. दरम्यान या यादीत माजी पाकिस्तानी नागरिक आणि भारतीय गायक अदनान सामीचं देखील नाव जोडलं गेलंय. भारतीय नागरिकत्व स्वीकारलेल्या अदनाननं या मुद्द्यावर एक व्यंग्यात्मक टिप्पणी केलं आहे. अदनान हा नेहमीच पाकिस्तानची खिल्ली सोशल मीडियावर उडवत राहतो. आता त्यानं पुन्हा एकदा एक्सवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.
अदनान सामीनं पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांची उडवली खिल्ली : अदनाननं जनरल मुनीर यांची खिल्ली उडवली आणि अप्रत्यक्षपणे त्यांना 'गाढवांचा राजा' असं म्हटलंय. अदनान सामीनं त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय,'फील्ड मार्शल झाल्यानंतर पाकिस्तान सरकारला संबोधित करताना जनरल असीम मुनीर यांनी दिलेलं स्वीकृती भाषण.' शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस म्हणतो,"माझ्या मित्रांनो आणि माझ्या भावांनो, तुम्ही मला तुमच्या संस्थेचा प्रमुख म्हणून निवडले याचा मला खूप आनंद आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, एक माणूस असूनही मी जगभरातील सर्व गाढवे, प्राणी आणि मानवांच्या हक्कांचे रक्षण करेन, जे प्राण्यांपेक्षाही वाईट जीवन जगत आहेत. मानवांनी नेहमीच तुम्हाला चूकीचं समजलं आहे. तुम्ही याबद्दल कधी विचार केला आहे का? अरे वेड्यांनो, तुम्ही मानवांना खूप महान समजता, पण मानव इतके हुशार आहेत की, गरज पडल्यास ते आपल्याला त्यांचे वडीलही बनवतात."
General #AsimMunir ’s Acceptance Speech addressed to the Government of Pakistan as his audience after being made FIELD MARSHAL!!🤭 pic.twitter.com/GEltVI8GCH
— Adnan Sami (@AdnanSamiLive) May 20, 2025
अदनान सामीबद्दल : दरम्यान अदनानबद्दल सांगायचं झालं तर त्याचा जन्म यूकेमध्ये झाला. त्याचे वडील पाकिस्तानी असून आई ही भारतीय होती. तो २००१ मध्ये भारतात आला आणि जवळजवळ एक दशक व्हिजिटिंग व्हिसावर येथे राहिला. त्याच्याकडे पाकिस्तान आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व होते, मात्र त्यानं २०१६ मध्ये ते सोडून दिले आणि भारतीय नागरिक बनला. अदनान सामी अनेकदा सोशल मीडियावर पाकिस्तान आणि त्यांच्या सरकारवर टीका करत असतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यानही त्यानं पाकिस्तानविरुद्ध तीव्र ट्विट केलं होतं. यापूर्वीही त्यानं अनेक वेळा पाकिस्तानवर टीका केली आहे.
हेही वाचा :