मुंबई - याआधी बऱ्याच प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकारांनी सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. छोट्या पडद्यावरील लोकप्रियतेचा फायदा घेत हे कलाकार मोठ्या पडद्यावर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. ही प्रवासयात्रा त्यांच्या अभिनय कारकिर्दीत नवे क्षितिज उघडत असते. परंतु बऱ्याच जणांना अपेक्षित यश मिळतेच असे नाही. 'छोट्या' पडद्यावरील 'मोठी' अभिनेत्री सुंबुल तौकीरनं २०१९ मध्ये आलेल्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका केली होती, ज्याचे विशेष कौतुकही झाले होते. आता ती एका हिंदी चित्रपटात शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. 'झाडफूंक’ या आगामी चित्रपटात सुंबुल तौकीर प्रमुख भूमिका साकारत आहे. सुंबुल तौकीर तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत झळकणार असून, यावेळी ती ‘झाडफूंक’ या आगामी चित्रपटात प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना ती म्हणते, “हे मी मनापासून इच्छिलं होतं… आणि ते प्रत्यक्षात घडलं!”
सुंबुल तौकीरनं व्यक्त केल्या भावना : सुंबुल ‘आर्टिकल १५’च्या शूटच्या आठवणी सांगताना म्हणाली की, “तेव्हा मी स्वतःलाच सतत म्हणायचे, ‘पुढच्या वेळी चित्रपटात काम करायचं, तेव्हा मुख्य भूमिकेतच करायचं. मी योग्य संधीची वाट पाहिली आणि माझ्या संयमाचा मला फायदा झाला. नंतर जेव्हा मला 'झाडफूंक'मधील प्रमुख भूमिका ऑफर झाली, तेव्हा सेटवर जाईपर्यंत विश्वासच बसत नव्हता. ‘झाडफूंक’ हा माझ्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे हे निश्चित. ही भूमिका साकारणं म्हणजे मी केलेल्या 'मॅनिफेस्टेशन'चे मोठं यश आहे".
'झाडफूंक’ची शूटिंग : ती पुढं म्हणाली की, "भूमिका स्वीकारताना मी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेते. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी ‘हो’ केलं असं नाही. मला जेव्हा वाटतं की यात काही अर्थपूर्ण मांडण्यासारखं आहे, तेव्हाच मी तो प्रोजेक्ट स्वीकारते, कारण हेच मला एक कलाकार म्हणून खऱ्या अर्थानं प्रेरित करतं. या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आणि आकर्षक वाटली. माझं मुख्य लक्ष ‘आस्था’ या पात्राला पूर्ण न्याय देण्याचं आहे.” टीव्ही आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये यशस्वी कारकीर्द घडवूनही सुंबुल आजही विविध माध्यमांमध्ये काम करण्यास तयार आहे. उत्तराखंडमध्ये 'झाडफूंक’ या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे.