मुंबई - मराठीमध्ये थ्रिलर अथवा भयपट फारसे बनत नाहीत. परंतु काही फिल्ममेकर्स या जॉनरचे चित्रपट बनवीत असतात. दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते एक भयपट घेऊन येताहेत, ज्याचे नाव आहे 'जारण'.'जारण' ही एक अशी कथा आहे जी मानवी भावना, दडपलेले अस्तित्व आणि गूढतेच्या पायऱ्या चढत प्रेक्षकांना अंतर्मुख करत नेईल. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
'जारण' चित्रपटाचं पोस्टर रिलीज : पोस्टर मधून कळले की 'जारण'मध्ये प्रमुख भूमिकेत अमृता सुभाष दिसणार आहे. नेहमीच वेगळी वाट चोखाळणारी आणि विविध भूमिकांमधून स्वतःची वेगळी छाप पाडणारी अमृता या चित्रपटात देखील एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे. पोस्टरमध्ये अमृताच्या चेहऱ्यावर टोचलेल्या टाचण्या, तिच्या डोळ्यातून व्यक्त होणारे गूढ आणि अस्वस्थ करणारा बाह्याकार हे सर्व पाहून चित्रपटात काय घडणार याविषयी अनेक तर्क लावले जात आहेत.
अमृता सुभाषनं 'जारण' चित्रपटाबद्दल केल्या भावना व्यक्त : या भूमिकेबाबत अमृता म्हणाली की, "कलाकार म्हणून मी कधीच एका विशिष्ट चौकटीत अडकलेली नाही. मला नेहमी काहीतरी नवीन करून पाहायला आवडते. 'जारण'मध्ये मी आजवर कधीच न केलेली आणि मानसिकदृष्ट्या आव्हान देणारी भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारताना दिग्दर्शक आणि सहकलाकारांचा मोठा आधार मिळाला. स्क्रिप्ट वाचताना ही कथा मला थेट भिडली आणि मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. अजून माझ्या पात्राविषयी फार काही उघड न करता येणार नाही, मी एवढंच म्हणेन की, ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत थरार देईल आणि विचार करायला भाग पाडेल."
'जारण' चित्रपटाबद्दल : या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केलं आहे. अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ए अँड सिनेमाज एलएलपी यांच्या प्रस्तुतीखाली आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस यांच्या निर्मितीत बनलेला 'जारण' हा चित्रपट ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.