मुंबई - रविंद्र महाजनी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू, देखणे आणि लोकप्रिय अभिनेते होते. ८०च्या दशकात त्यांनी रोमँटिक हीरो म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचा मुलगा गश्मीर देखील मनोरंजनसृष्टीत हँडसम हंक म्हणून ओळखला जातो. गश्मीर महाजनी हा मराठी सिनेसृष्टीतील एक देखणा, दमदार आणि हरहुन्नरी अभिनेता आहे. त्यानं अभिनय, नृत्य आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. वडील रवींद्र महाजनी यांचा अभिनयवारसा तो समर्थपणे पुढे नेत आहे.
गश्मीर करणार लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण : आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक म्हणूनही प्रेक्षकांना सामोरा जाणार आहे. त्यानं आपल्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा केली आहे. तो आता लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्यानं त्याच्या या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची सोशल मीडियावर घोषणा केली. जीआरम्स इव्हेंट्स अँड प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे निर्माते गौरी महाजनी, माधवी महाजनी आणि गश्मीर महाजनी असून लेखन आणि दिग्दर्शन गश्मीर स्वतः करत आहे. अभिनय क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेला गश्मीर आता कॅमेऱ्यामागे जाऊन एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण सुप्रसिद्ध डीओपी सत्यजीत शोभा श्रीराम करणार आहेत. गश्मीरच्या या नव्या इनिंगबद्दल मराठी सिनेसृष्टीतूनही शुभेच्छांचा वर्षाव होत असून या चित्रपटाचं नाव आणि कलाकार जाणून घेण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


गश्मीर महाजनीनं व्यक्त केल्या भावना : आपल्या या नवीन प्रवासाविषयी गश्मीर महाजनी म्हणाला, “दिग्दर्शन हे माझं एक दीर्घकाळापासूनचं स्वप्न आहे. अभिनय करताना अनेक गोष्टी शिकलो, पडद्यामागचादेखील खूप अनुभव घेतला आणि आता खोलवर काही सांगायचं राहून गेलं होतं, ते माझ्यापद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता त्या भावना, ती विचारांची प्रक्रिया मी कॅमेऱ्याच्या मागून मांडणार आहे. चित्रपट ही एक सामूहिक कला आहे, मात्र काही कथा अशा असतात, ज्या फक्त आपल्या दृष्टिकोनातूनच सांगितल्या जाऊ शकतात. माझा हा चित्रपट म्हणजे माझ्या मनात कित्येक वर्षांपासून रुजत गेलेली कल्पना आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं ही गोष्ट सुरू करत असल्यामुळे हे एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण आहेत. ही जबाबदारी मोठी आहे, परंतु प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम हेच माझं बळ आहे.”
हेही वाचा :