मुंबई - गायक अभिजीत सावंत हा भारताचा पहिला 'इंडियन आयडॉल' विजेता असून त्यानं आपल्या सुरेल आवाजानं लाखो श्रोत्यांची मनं जिंकली आहेत. संगीत क्षेत्रात त्याला आता २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 'मोहब्बतें लुटाऊंगा', 'जुनून', 'मराठी पाऊल पडे पुढे' यांसारख्या गाण्यांनी त्याला लोकप्रियता मिळवून दिली. मराठी, हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये तो सक्रिय आहे. नुकतेच त्याचे 'चाल तुरु तुरु’चे नवीन व्हर्जन असलेले गाणे खूप गाजले.
अभिजीत सावंतनं त्याच्या नवीन गाण्याची केली घोषणा : मूळ मराठी गाणं 'चाल तुरु तुरु' हे प्रसिद्ध झालं होतं, १९९० च्या दशकात, आणि या गाण्याचे संगीतकार अशोक पत्की आहेत. यामध्ये ग्रामीण सौंदर्य, गोड शब्दरचना आणि पारंपरिक लय यांचा सुंदर मिलाफ आहे. हे गाणं आजही लोकांच्या ओठांवर टिकून आहे. याच गाण्याचं नवीन व्हर्जन आधुनिक ढंगात सादर करण्यात आलं, ज्यात अभिजीतचा आवाज आणि स्टाइल दोन्ही लक्ष वेधून घेतात. आता त्यानं एक नवीन लूक सादर करत 'पैसा थेंब थेंब गळं' या आगामी गाण्याची घोषणा केली आहे.

अभिजीतचं 'पैसा थेंब थेंब गळं' हे नवीन गाणं : नवीन ढंगातील ‘चाल तुरु तुरु’च्या यशानंतर आता अभिजीत नव्या सुरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या मोहक आवाजानं लाखो रसिकांच्या मनावर राज्य करणारा गायक अभिजीत सावंत यानं अनेक वेगवेगळे संगीतमय प्रोजेक्ट्स केले आणि अजूनही तो नवनवीन प्रयोग करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं सोशल मीडियावर आपला एक हटके लूक शेअर केला होता, ज्यानं चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती. आता त्या लूकमागचं कारणही समोर आलं आहे. अभिजीत लवकरच 'पैसा थेंब थेंब गळं' हे खास गाणं प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांनी नेहमीच अनुभवली असून हे गाणंही वेगळ्या धाटणीचं असणार आहे. अलीकडील एका मुलाखतीत अभिजीतच्या अभिनय क्षेत्रात येण्याबाबतही चर्चा रंगल्या आहेत. गायक म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेल्या अभिजीतला अभिनय करताना पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच एक नवा अनुभव ठरणार आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात तो प्रवेश करणार का, यावरही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा :