मुंबई - बॉलिवूड चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही काळानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होतात, यामागील काही कारणं म्हणजे अधिक महसूल, प्रेक्षकांपर्यंत व्यापक पोहोच. हा आजच्या काळातला यशस्वी आणि 'संतुलित व्यवसायिक फॉर्म्युला' मानला जातो कारण निर्मात्यांना थिएटर आणि ओटीटी माध्यमांतून मिळकत होते. परंतु सुपरस्टार आमिर खान मात्र या 'संतुलित व्यवसायिक फॉर्म्युल्याला' न जुमानता आपला आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर' फक्त चित्रपटगृहांतच प्रदर्शित करणार असून त्यावर तो ठाम आहे.
आमिर खाननं घेतला मोठा निर्णय : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आकर्षक ऑफर्स नाकारत आमिर खाननं त्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ फक्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. आमिर खाननं हा निर्णय घेताना मोठ्या आर्थिक जोखमीचा सामना करण्याची तयारी दाखवली आहे. या निर्णयामुळे बॉलिवूडमध्ये एक चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. “मी चित्रपटांचा निष्ठावंत आहे आणि मला त्यावर विश्वास आहे. हो, यात मोठी आर्थिक जोखीम आहे. जर चित्रपट चालला नाही तर प्रचंड नुकसान होऊ शकतं. पण तरीही मी ओटीटी डील्स नाकारल्या, कारण मला प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहावा असं वाटतं,” असं आमिरनं स्पष्टपणे सांगितलं.
'सितारे जमीन पर' ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही : सध्याच्या काळात बहुतांश निर्माते ओटीटी किंवा हायब्रिड रिलीजचा मार्ग निवडत असताना आमिरनं फक्त थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला, जो धाडसी आणि जुन्या काळाची आठवण करून देणारा आहे. अनेक सहकारी आणि मित्रांनी त्याला या निर्णयाविरोधात सल्ला दिला होता. मात्र एक खास संध्याकाळ त्याच्या निर्णयाला बळ देणारी ठरली, जेव्हा त्याची भेट झाली महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी. “त्या रात्री मी बच्चन सरांना भेटलो. मला काय झालं कोण जाणे, पण मी माझं मन मोकळं केलं... मी घाबरलेलो होतो, पण त्यांनी मला विचारलं, ‘का नाही करत तू? तू तर नेहमीच जोखीम घेतली आहेस!’ त्यांचा हा सल्ला ऐकून माझा विश्वास अजूनच दृढ झाला,” असं आमिरनं सांगितलं.
'सितारे जमीन पर' कधी होणार प्रदर्शित : या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘शुभ मंगल सावधान’ सारखा यशस्वी आणि वेगळा सिनेमा देणारे आर. एस. प्रसन्ना यांनी केलं आहे. प्रमुख भूमिकेत आमिर खान आणि जेनेलिया डिसूजा देशमुख झळकणार आहेत. गीतकार अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार तिकडी शंकर-एहसान-लॉय आणि पटकथालेखिका दिव्य निधी शर्मा यांचा सहभाग या चित्रपटात आहे. या चित्रपटाचे निर्माते आमिर खान, अपर्णा पुरोहित असून सहनिर्माते रवी भागचंदका आहेत. ‘सितारे जमीन पर’ २० जून २०२५ रोजी संपूर्ण भारतात फक्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :