मुंबई - सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरात बेकायदेशीर प्रवेश करण्याचा प्रयत्न एका महिलेनं केला. या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली असून तिची कसून चौकशी केली जात आहे. सलमानच्या घरी घुसण्याचा हा या आठवड्यातील दुसरा प्रयत्न आहे. काही समाजकटकांनी सलमानला धमकी देण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या घराभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली असताना ही घटना घडली.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या महिलेनं इमारतीची हाय-प्रोफाइल सुरक्षा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु तिला सलमानच्या घरात घुसण्यापासून रोखण्यात आलं. सध्ये तिची चौकशी सुरू असून तिची खरी ओळख, राहण्याचं ठिकाण, सलमानच्या निवासस्थानी येण्याचा मूळ हेतु अशा अनेक बाबींची पडताळणी केली जात आहे. ती मुंबईतलीच रहिवासी आहे की दुसऱ्या कुठल्या शहरातून ती आली आहे याबद्दल अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
या आठवड्याच्या सुरुवातीला अशाच प्रकारच्या सुरक्षा उल्लंघनाच्या घटनेनंतर ही घटना घडली आहे.२० मे रोजी, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये चोरट्यानं प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हा माणूस छत्तीसगडचा असल्याचे समोर आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला घडलेल्या या घटनेनंतर लगेचच ही दुसरी घटना घडली आहे. ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या महिलेला वेळीच पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.
कामाच्या आघाडीवर, सलमान खान अखेरीस 'सिकंदर' या चित्रपटामध्ये दिसला होता. यामध्ये त्यानं रश्मिका मंदान्नाबरोबर भूमिका केली होती. दिग्दर्शक मुरुगदास यांनीच पुढाकार घेऊन या चित्रपटाची स्क्रिप्ट निर्माता साजिद नाडियादवाला यांच्याकडे पोहोचवली होती असा खुलासा सलमाननं एका मुलाखतीत केला होता. "खरंतर ही मुरुगदास यांची स्क्रिप्ट होती आणि मुरुगदास यांनीच ती साजिद नादियाडवाला यांना ऐकवली. पुढच्याच दिवशी साजिदचा मला फोन आला म्हणाला की तूही ऐकून घे तपलाही पसंत येईल. त्यामुळं मी ऐकली. मी म्हटलं, यात न आवडण्यासारखं काय आहे? तर अशा प्रकारे हा चित्रपट बनला," असं सलमान म्हणाला होता.
हेही वाचा -