मुंबई - गेल्या काही वर्षांपासून भारतीय वेब सिरीज ग्रामीण प्रांतात घडताना दिसत असून त्यांना जोरदार प्रतिसादही मिळताना दिसतो. या सिरीजमधून गावांमधील खऱ्या समस्या, संघर्ष, संस्कृती आणि जीवनशैली प्रभावीपणे मांडली जाते. शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, जात-पात यांसारखे विषय या सिरीजमध्ये मांडले जातात. या कथा मनोरंजनाबरोबरच सामाजिक जागरूकता वाढवतात आणि शहराच्या झगमगाटाच्या पलिकडचा खरा भारत या सिरीजमधून उलगडतो. प्रेक्षकांना भावणाऱ्या साध्या पण प्रभावी कथा ही यांची खासियत आहे.
त्याच पठडीतील ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रातील भीषण वास्तव उजागर करणारी 'ग्राम चिकित्सालय’ ही वेब सिरीज असून तीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. यातून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यात आला असून गावकऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित संघर्ष, विनोदाशी हातमिळवणी करीत मांडले गेले आहेत. दिग्दर्शक राहुल पांडे यांनी साकारलेली वेब सिरीज ‘ग्राम चिकित्सालय’ मनोरंजनासोबत सामाजिक जाणीवही निर्माण केल्यामुळे प्रेक्षक या मालिकेशी रिलेट करू शकले आहेत.
ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा प्रामाणिक वेध : ही सिरीज एका काल्पनिक उत्तर भारतीय गावातील ‘भटकंडी’ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर घडते. इथल्या दैनंदिन घडामोडी, मोडकळीस आलेली व्यवस्था, आणि गावकऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित संघर्ष, विनोदाच्या साह्याने मांडले गेले आहेत. यामध्ये मानसिक आरोग्याचे महत्त्व, शहरी-ग्रामीण अंतर, आणि सिस्टममधील त्रुटी अत्यंत समजूतदारपणे अधोरेखित केल्या आहेत.
प्रेक्षकांना भिडणारा डॉ. प्रभातचा प्रवास : या सिरीजचा नायक डॉ. प्रभात सिन्हा (अमोल पाराशर) हा शहरातील सुखवस्तू आयुष्य मागे टाकून गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नवसंजीवनी फुंकण्याचा निर्णय घेतो. त्याचा हा प्रवास म्हणजे केवळ एका डॉक्टरची जबाबदारी नव्हे, तर मातीशी असलेली नाळ पुन्हा जोडण्याची ही एक भावना आहे.
ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील भीषण वास्तव : देशातील डॉक्टर-रुग्ण प्रमाण हे १:१००० असूनही अनेक गावांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत, गावकऱ्यांना वैद्यांवर अवलंबून राहावे लागते. ‘ग्राम चिकित्सालय’ ही अडचण अत्यंत प्रगल्भतेने सादर करते आणि दुर्लक्षित आरोग्य क्षेत्राचा वास्तव दर्शवते.
झगमगाटापेक्षा वास्तवाचा प्रकाशझोत : ही सिरीज एका बाजूला विनोदी व हलक्याफुलक्या क्षणांनी सजलेली असली, तरी तिचं मूळ वास्तवाशी जोडलेलं आहे. ग्रामीण भारतातील समस्यांकडे तिला केवळ लक्ष वेधायचं नाही, तर त्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करायला भाग पाडायचं आहे.

शहरी दृष्टीकोनाला गावाकडची उत्तरं : ‘ग्राम चिकित्सालय’ या सिरीजमुळे आपणास समजते की बदलाची खरी सुरुवात गावाकडूनच होते. झगमगाटाच्या बाहेर पडून, खऱ्या भारतात डोकावण्याची संधी ही सिरीज देते.

एकूणच, ग्रामीण विषयांवरील वेब सिरीज हे भारतीय ओटीटी विश्वाचं महत्त्वाचं अंग बनत चाललं आहे. ग्रामीण समाजातील मूलभूत गरजा, त्यातील विसंगती आणि संघर्ष दर्शविणारी ‘ग्राम चिकित्सालय’ या सिरीजने ओटीटी विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, सामाजिक भान जागवणाऱ्या सर्जनशीलतेचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
हेही वाचा -
- बाफ्टा, कान्ससाठी नामांकित 'सिस्टर मिडनाईट' २३ मे रोजी होणार रिलीज, अभूतपूर्व भूमिकेत दिसली राधिका आपटे
- आमिर खान आणि राजकुमार हिराणी पुन्हा एकत्र, दादासाहेब फाळके बायोपिकच्या शूटिंगला होणार सुरूवात
- 'मिशन: इम्पॉसिबल - द फायनल रेकनिंग'ला स्टँडिंग ओवेशन, सलग ५ मिनीटं टाळ्यांचा कडकडाट, टॉम क्रूझ झाला भावुक