34 हजार कोटींचे राज्य सरकारबरोबर 17 सामंजस्य करार, मुख्यमंत्री म्हणाले, "स्वाक्षरी करून थांबणार नाही"!
राज्यात गुंतवणुकीसाठी 17 कंपन्यांनी सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे राज्यात 33 हजार नोकऱ्या तयार होईल, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षा व्यक्त केली.


Published : August 29, 2025 at 7:57 PM IST
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे राज्यभरात उत्साहाचं वातावरण असताना राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात गुंतवणुकीसाठी 17 कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे एकूण 34 हजार कोटींची नवीन गुंतवणूक यानिमित्तानं येणार आहे. या माध्यमातून 33 हजार नोकऱ्या तयार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
सह्याद्री अतिथीगृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. माझ्यासह उद्योग भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल 17 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारांची एकूण किंमत सुमारे 33 हजार 768।89 कोटी रुपये आहे. त्यातून राज्यात सुमारे 33 हजार 483 रोजगारनिर्मिती होणार आहे. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बस आणि ट्रक, संरक्षण आणि त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ आणि कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे.
करारावर स्वाक्षरी करून थांबणार नाही! मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. आम्ही फक्त करारावर स्वाक्षरी करून थांबणार नाही, तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील. याबाबत कुठेही अडथळा येणार नाही. यावेळी त्यांनी मैत्री पोर्टल या वन-स्टॉप संकल्पनेचा विशेष उल्लेख केला. उद्योगांसाठी जमीन, परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीनं मिळवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.
विजेचे दर कमी होणार- ऊर्जाविषयक निर्णयांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, राज्यात नुकताच 5 वर्षांचा मल्टी-इयर टॅरिफ मंजूर झाला असून वीजदर वर्षागणिक कमी होणार आहेत. पूर्वी दरवर्षी वीजदर ९ टक्क्यांनी वाढत होता. पण आता विजेचे दर कमी होणार आहेत. हे उद्योगांसाठी मोठे दिलासादायक ठरणार आहे. उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचं जीवनचक्र (Investment Life Cycle) राज्य सरकारनं स्थिर आणि अंदाजपत्रित ठेवण्याचं धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कंपन्यांसोबत झाले करार- या करारात मे. ग्रॅफाईट इंडिया लि. मे. नेक्ट जनरेशन मॅन्युफॅक्चुरिंग प्रा.लि., मे.युरोबस भारत प्रा.लि., मे.व्हिर्च्यसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि., मे.युनो मिंडा ॲटो इनोव्हेशन प्रा.लि., मे.इनर्जी इन मोशन प्रा.लि., मे.जनरल पॉलिफिल्म प्रा.लि., मे.पीएस स्टील ॲण्ड पॉवर प्रा.लि., मे.बीएसएल सोलर लि., मे.सुफ्लॅम मेटल्स प्रा.लि., मे.सुफ्लॅम इंडस्ट्रीज प्रा.लि., मे.किर्तीसागर मेटॅलॉईड प्रा.लि., मे.गोदरेज ॲण्ड बायस मॅन्युफॅक्चरिंग कं.लि., मे.सेरम ग्रुप ऑफ कंपनीज (सेरम इन्स्टिट्यूट आणि रायझिंग सन सह), अंबुजा सिमेंट लि., पॅरासन मशिनरी इंड प्रा.लि. आणि मे.आर्सेलर मित्तल जीसीसी प्रा.लि. यांनी सहभाग नोंदविला.
हेही वाचा-

