अहमदाबाद- गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये गुरुवारी (12 जून) अतिशय भीषण विमान अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळलं. अपघातापूर्वी विमानाच्या पायलटनं एटीसीला मेडे (MAYDAY) कॉल केला होता. यानंतर एटीसीनंही प्रत्युत्तरात कॉल केला, पण तो अनुत्तरीत राहिल्याचं डीजीसीएनं आपल्या निवेदनात सांगितलं. अशा स्थितीत MAYDAY कॉल म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
MAYDAY कॉल म्हणजे काय? - MAYDAY कॉल हा एक आपत्कालीन सिग्नल आहे. याचा वापर जीव वाचवण्यासाठी केला जातो. हा शब्द विशेषतः विमानं आणि समुद्री जहाजांमध्ये वापरला जातो. आग किंवा पोलीस कारवाईदरम्यान देखील याचा वापर केला जातो. आणीबाणीच्या वेळी 'MAYDAY MAYDAY MAYDAY' असं सलग तीनवेळा म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा विमानात संकट येतं, तेव्हा विमानाचा पायलट जवळच्या एटीसीला संदेश पाठवतो. याचा अर्थ विमानात संकट आहे आणि प्रवासी आणि क्रू मेंबर्सचे जीव धोक्यात आहेत. याला आपत्कालीन कॉल असेही म्हणतात. पण ते सांगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. विमानात उद्भवलेला धोका कोणत्या प्रकारचा आहे? याची माहिती कॉलवर दिली जाते. यामध्ये इंजिनात बिघाड होऊ शकतो, आकाशात विमानाची आणि एखाद्या पक्ष्याची धडक होऊ शकते किंवा खराब हवामानामुळं विमानाला काही समस्याही येऊ शकतात. अशा इत्यादी कारणांमुळे पायलट जवळच्या एटीसीला MAYDAY कॉल करू शकतो.
विमानातील अडचण सांगण्याआधी पायलट तीनवेळा MAYDAY म्हणतो- विमानात काय अडचण आहे, याचा मेसेज देण्यासाठी पायलट तीनवेळा MAYDAY, MAYDAY, MAYDAY म्हणतो. MAYDAY कॉल म्हणजे विमान अडचणीत आहे आणि वेळ वाया न घालवता तत्काळ मदतीची आवश्यकता आहे. विमानाच्या रेडिओवर तीन वेळा "मेडे", "मेडे", "मेडे" असं म्हटलं जातं. जेणेकरून हा कोणताही विनोद नाही तर वास्तविक संकट आहे आणि मदतीची आवश्यकता आहे.
स्टॅनली मॉकफोर्ड यांनी या फ्रेंच शब्दाचा शोध लावला- MAYDAY शब्द वापरण्याची सुरुवात 1921 मध्ये झाली. लंडनच्या फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्ड यांनी याचा शोध लावला. ते एक रेडिओ अधिकारी होते. त्यांना आणीबाणीच्या वेळी वापरता येईल, आणि पटकन् बोलता येईल असा लहानसा शब्द शोधण्यास सांगण्यात आलं. यानंतर त्यांनी मेडे हा शब्द सुचवला. हा शब्द फ्रेच भाषेतून घेण्यात आला असून याचा अर्थ 'मला मदत करा', असा होतो.