नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अहमदाबादला पोहोचले असून, त्यांनी 12 जून रोजी विमान कोसळलेल्या ठिकाणाची प्रथम पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमींची भेट घेतली. तसेच त्यांनी एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील एकमेव जिवंत प्रवाशाच्या प्रकृतीची विचारपूसही केली. पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले की, 'अहमदाबादमधील विमान अपघाताने आम्ही सगळेच हताश झालो आहोत. इतक्या लोकांचा अचानक आणि हृदयद्रावक मृत्यू शब्दात वर्णन करता येणार नाही. सर्व शोकग्रस्त कुटुंबांबद्दल आमच्या संवेदना आहेत. आम्हाला त्यांचे दुःख समजते. तसेच त्यांची राहिलेली पोकळी आपल्याला कायम जाणवेल, ओम शांती, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.
मलबा हटवण्याचे काम अजूनही सुरू : केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापु, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि इतर अधिकारी पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत होते. उपायुक्त कानन देसाई यांच्या म्हणण्यानुसार, अपघातस्थळावरून मलबा हटवण्याचे काम रात्रभर सुरू राहिले आणि काही मलबा अजूनही हटवायचा आहे. मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. 265 मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेत. त्यापैकी 241 प्रवासी अपघाताच्या वेळी विमानात होते. तर उर्वरित स्थानिक लोक आहेत, जे विमान अपघाताच्या वेळी जवळपास उपस्थित होते.
We are all devastated by the air tragedy in Ahmedabad. The loss of so many lives in such a sudden and heartbreaking manner is beyond words. Condolences to all the bereaved families. We understand their pain and also know that the void left behind will be felt for years to come.…
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2025
अपघातग्रस्त झालेल्या विमानात 169 भारतीय नागरिक : एअर इंडियाकडून मदत केंद्रे स्थापन अपघातग्रस्त झालेल्या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, सात पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनेडियन नागरिक होता. अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईक आणि मित्रांसाठी एअर इंडियाने अहमदाबाद, मुंबई, दिल्ली आणि गॅटविक (लंडन) विमानतळांवर मदत केंद्रे स्थापन केली आहेत. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, ही केंद्रे कुटुंबातील सदस्यांना अहमदाबादला प्रवास करण्यास मदत करत आहेत. याव्यतिरिक्त एअरलाइन्सने भारतातील कॉलर्ससाठी 1800 5691 444 आणि भारताबाहेरील कॉलर्ससाठी +918062779200 हा एक प्रवासी हॉटलाइन क्रमांक सुरू केला आहे.
हेही वाचाः
प्रतिकूल परिस्थितीत यशाची भरारी घेऊन रोशनी झाली हवाई सुंदरी, विमान अपघातात गमावले प्राण
अपघातग्रस्त विमानात राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिकांचा समावेश