लखनौ- यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर देशाच्या विविध भागातून पाकिस्तानी हेर पकडण्याचे सत्र सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसनं थेच पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून पाकिस्तानी गुप्तहेराला दहशतवाद विरोधी पथकानं (एटीएस) अटक केली आहे. मोहम्मद तुफैल असे या गुप्तहेराचं नाव आहे.
- पाकिस्तानी गुप्तहेर तुफैल हा गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानी सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या संपर्कात होता. एटीएसनं तुफैलला वाराणसीतील आदमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवापूर दोशीपुरा येथून अटक करण्यात आली.
तुफैलच्या व्हॉट्सअपमध्ये पाकिस्तानमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना साद रिझवीचे व्हिडिओ आढळले आहेत. गजवा-ए-हिंद आणि देशात शरिया कायदा लागू करणे यासंबंधी गुप्तहेर व्हिडिओ इतर व्हॉट्सअपमध्ये शेअर करत होता. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून (एटीएस) त्याला अटक केली. एटीएसच्या माहितीनुसार तुफैल हा ६०० हून अधिक पाकिस्तानी फोन नंबरवर संपर्कात होता. तो फेसबुकद्वारे पाकिस्तानातील फैसलाबाद येथील नफीसा नावाच्या महिलेच्या संपर्कात होता. या महिलेचा पती हा पाकिस्तानच्या सैन्यदलात अधिकारी आहे.
एटीएसकडून तपास सुरू- एटीएसच्या म्हणण्यानुसार, तुफैल हा वाराणसीतील त्याच्या जवळच्या लोकांसोबत पाकिस्तानी व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक सतत शेअर करत होता. त्यांना पाकिस्तानच्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना साद रिझवी याच्याबरोबर संपर्क साधण्याचं आवाहन करत होता. वाराणसीतील आणखी किती लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत? त्यांनी काय शेअर केलं, याचा तपास एटीएसकडून करण्यात येत आहे.
गुप्तहेरानं पाकिस्तानात काय माहिती पाठविली? तुफैलने राजघाट, जामा मशीद आणि वाराणसीतील काही दाट लोकवस्तीच्या भागांचे फोटो आणि तपशील पाकिस्तानमधील काही व्यक्तींना शेअर केले होते. तुफैलने राजधानी दिल्लीपासून वाराणसीपर्यंतच्या इतर अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटोही शेअर केले होते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यामध्ये वाराणसीतील ज्ञानवापी परिसराचाही समावेश करण्यात आला आहे. काशीचा नमो घाट, विश्वनाथ मंदिर परिसर, संकट मोचन मंदिर, कॅन्ट रेल्वे स्टेशन यासह इतर अनेक ठिकाणांची माहितीदेखील त्यानं पाकिस्तानमध्ये पाठविली आहे.
हेही वाचा-