श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातील गुंड कंगन भागात रविवारी पर्यटक वाहनाची बससोबत धडक झाली. या अपघातात महाराष्ट्रातील तीन पर्यटकांसह एका चालकाचा मृत्यू झाला आहे. तर, १७ प्रवासी जखमी झालेत. श्रीनगर-सोनमर्ग रस्त्यावर हा अपघात झाला, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱयांनी दिली.
तीन पर्यटकांसह चालकाचा मृत्यू : पर्यटक वाहन आणि बस यांच्यातील धडक इतकी जोराची होती की, वाहनातून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. या अपघातात १७ जण जखमी झालेत. अपघातातील काही जखमींना स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल केलंय तर, तिघांना श्रीनगरमधील एसकेआयएमएस रुग्णालयात दाखल केलं आहे, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यानं दिली.
मृत पर्यटकांची ओळख पटली : श्रीनगर-सोनमर्ग रस्त्यावर झालेल्या अपघातातातील मृत्यू झालेल्या पर्यटकांची ओळख पटली आहे. अपघातात मृत्यू झालेले तीन पर्यटक महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. लेशिया आशिष पारी, निक्की आशिष पारी आणि हेतल आशिष पारी अशी मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावं आहेत. तर पर्यटक वाहन चालकाचाही अपघातात मृत्यू झालाय. तो श्रीनगरमधील सोईतांग इथला रहिवासी होता. त्याचं नाव फहीम अहमद बदयारी असं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि बचाव पथकानी बचाव कार्य केलं.
जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख : जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं. "या घटनेनं मला खूप दुःख झालंय. या अपघातात चालक आणि तीन पर्यटकांचा मृत्यू झालाय. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. अधिकारी सर्वतोपरी मदत करत आहेत," असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्षनेते रविंदर रैना यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं.
हेही वाचा :