नवी दिल्ली- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी नवीन महाराष्ट्र सदन येथे महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील सरहद संस्थाननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान केला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियादेखील उपस्थित होते.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. ते म्हणाले," अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण? याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचं नाव समोर येतं. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचं काम शिंदे यांनी केलं."
एकनाथ शिंदे यांनी कधीही पक्षीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल-९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, शरद पवार
पवार गुगली टाकणार नाहीत- पुरस्कारावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , " महादजी शिंदे यांचं घराणं सातारा जिल्ह्यातील कणेरखेड येथं आहे. याच जिल्ह्यात माझाही जन्म झाला. माजी क्रिकेटपटू सदु शिंदे यांचे शरद पवार जावई आहेत. दिल्लीच्या तख्ताचं रक्षण करणारे महादजी शिंदे यांच्या स्मृतीला मी आदरांजली वाहतो. या सन्मानासोबत मोठी जबाबदारी वाढली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. शरद पवारजींकडून मला हा पुरस्कार मिळाल्यानं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पवार साहेबांची राजकारणातील गुगलीही कळत नाही. मात्र, माझे पवार साहेबांचे चांगले संबध आहेत. त्यामुळे ते मला गुगली टाकणार नाहीत."
माझ्या मराठी मातीचे केलेले कौतुक असून माझ्यासोबत अहोरात्र कष्ट करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचा, लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचा हा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई शाह आपल्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले म्हणून महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात प्रचंड… https://t.co/pl7NqlbUDS pic.twitter.com/lue5XTmj2r
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 11, 2025
महादजी शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यासक्रमात समावेश- उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, " पानिपतानंतर अवघ्या १० वर्षात महादजी शिंदे यांनी दिल्लीत भगवा फडकवला. ब्रिटिशांना महादजी शिंदेंमुळे देशात सत्ता काबीज करण्यासाठी तब्बल ५० वर्ष वाट पहावी लागली. त्यामुळेच ब्रिटीशांनी त्यांना 'ग्रेट मराठा' ही पदवी बहाल केली होती. रणांगणात कामिगिरी फत्ते करणाऱ्या मावळ्यांना सोन्याचे सलकडं देण्याची इतिहासात प्रथा होती. माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे सोन्याचं सलकडं आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. महादजी शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल. तसेच कणेरखेड येथे महादजी शिंदे यांच्या राष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य सरकार विचार करेल," अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका- एकनाथ शिंदे म्हणाले," जिथे जाईन तिथे लोक शिवसेनेत सामील होण्यासाठी येतात. दिल्लीतही अनेक लोक शिवसेनेत सामील झाले आहेत. अडीच वर्षांपूर्वी माझं एक मोठे ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर मी आता लहान ऑपरेशन करत आहे. लोक उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून शिवसेनेत येत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना (उद्धव ठाकरे) यांची जागा कुठे आहे, हे दाखवून दिलं आहे. पंतप्रधान मोदींना दोष देणं त्यांना शोभत नाही. पंतप्रधान मोदी देशाला पुढे घेऊन जात आहेत. देश जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. अशा परिस्थितीत त्याच्यावर आरोप करणं अत्यंत दुर्दैवी आहे."
मराठी साहित्य संमेलन दिल्लीत ही अभिमानाची गोष्ट- पुरस्कार समारंभानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित केलं जात आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सर्वजण त्यासाठी एकत्र काम करत आहोत. मला महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. मी आयोजकांचे आभार मानतो."'
हेही वाचा-