मुंबई- ज्याची भीती होती अखेर तेच घडलंय. आशियामधील शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा परिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आणि सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. प्री-ओपन मार्केटमध्येच दोन्ही शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना दिसले. यानंतर जेव्हा बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 3000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह उघडला, तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 1000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करीत होता. टाटा मोटर्सपासून रिलायन्सपर्यंत सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
सेन्सेक्स-निफ्टी उघडताच कोसळले : शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 71,449 वर उघडला, जो त्याच्या मागील बंद 75,364.69 च्या तुलनेत खूपच घसरला, तर एनएसई निफ्टीने 21758 वर व्यवहार सुरू केला, जो त्याच्या मागील बंद 22,904 च्या तुलनेत घसरला. यानंतर दोन्ही निर्देशांक काही वेळातच आणखी घसरले, जिथे निफ्टी-50 हा 1000 अंकांनी घसरून 21,743 वर पोहोचला, तर सेन्सेक्स 71,425 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.
रिलायन्स ते टाटापर्यंतचे शेअर्स कोसळले : सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई लार्ज कॅप निर्देशांक पूर्णपणे लाल रंगात दिसत होता. सर्व 30 प्रमुख कंपन्यांचे शेअर्स खूपच घसरले होते. दरम्यान, सर्वात मोठी घसरण टाटा स्टीलच्या शेअरमध्ये झाली आणि तो 10.43 टक्क्यांनी घसरून 125.80 रुपयांवर आला. याशिवाय टाटा मोटर्सचा शेअर (8.29%), इन्फोसिसचा शेअर (7.01%), टेक महिंद्राचा शेअर (6.85%), एलटी शेअर (6.19%), एचसीएल टेक शेअर (5.95%), अदानी पोर्ट्सचा शेअर (5.54%), टीसीएसचा शेअर (4.99%), रिलायन्सचा शेअर (4.55%) आणि एनटीपीसीचा शेअर (4.04%) घसरणीसह व्यवहार करत होते. याशिवाय मारुती शेअर, कोटक बँकेचा शेअर, अॅक्सिस बँकेचा शेअर, इंडसइंड बँकेचा शेअर, टायटनचा शेअर, एसबीआयचा शेअर, बजाज फायनान्सचा शेअर, एचडीएफसी बँकेचा शेअर, आयसीआयसीआय बँकेचा शेअर यामध्ये 2-3 टक्क्यांनी घसरण झाली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप देखील वाईट स्थितीत : सोमवारी लार्ज कॅप शेअर्सप्रमाणेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही अशाच वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. मिडकॅपमध्ये पीएसबी शेअर (7.94%), भारत फोर्ज शेअर (7.86%), कोफोर्ज शेअर (7.17%), माझगाव डॉक शेअर (7%), एमक्युअर फार्मा शेअर (6.77%) यांचा समावेश आहे. आरव्हीएनएल शेअर (6%) आणि सुझलॉन शेअर (6.74%) घसरणीसह व्यवहार करत होते. स्मॉलकॅप समभागांमध्ये जेटीएल इंडियाने सर्वाधिक 13% घसरण नोंदवली.
गेल्या आठवड्यात मोठी घसरण : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्सच्या टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 2.94 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले आणि टाटांच्या टीसीएसपासून मुकेश अंबानीच्या रिलायन्सपर्यंत सर्वांना मोठे नुकसान सहन करावे लागले यावरून याचा अंदाज येतो. गेल्या शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 930.67 अंकांनी म्हणजेच 1.22 टक्क्यांनी घसरून 75,364.69 वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 345.65 अंकांनी म्हणजेच 1.49% ने घसरून 22,904.45 वर बंद झाला. सोमवारी भारतीय शेअर बाजाराला आधीच कमकुवत जागतिक संकेत मिळत होते. खरंतर, आशियाई शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत होती. हाँगकाँगचा हँग सेंग 9 टक्क्यांहून अधिक घसरला होता, तर जपानचा निक्केई 8 टक्क्यांहून अधिक घसरत होता. दरम्यान, निफ्टीबद्दल बोलायचे झाल्यास सुरुवातीच्या व्यवहारातच तो 900 अंकांपेक्षा जास्त घसरला होता. इतर आशियाई बाजारपेठांमध्येही 4-5 टक्क्यांची घसरण दिसून आली.
घाबरू नका, सबुरीने घ्या, गुंतवणूकदारांना तज्ज्ञांचा सल्ला : शेअर बाजारासाठी सोमवार 7 एप्रिल हा दिवस "ब्लॅक मंडे" ठरलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या "टॅरिफ बॉम्ब"मुळे भारतीय शेअर बाजार आपटले. मात्र, अशा स्थितीत पॅनिक न होता दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा, असा सल्ला अर्थतज्ज्ञ गिरीश जाखोटिया यांनी दिलाय. "ईटीव्ही भारत"शी बोलताना ते म्हणाले की, ही पडझड अपेक्षित होती. खरे तर डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होणार होते, तेव्हापासूनच ही लक्षणे दिसत होती. त्यांची विचारसरणी ही टोकाच्या राष्ट्रवादाची असल्यामुळे हा फरक तेव्हापासूनच जाणवलेला होता. भारतीय शेअर बाजार ओव्हरव्हॅल्युड आहेत. टॅरिफ इफेक्टची चाहूल आंतरराष्ट्रीय स्तरावर लागल्यामुळे मोठे गुंतवणूकदार नफा कमावून मोकळे होतात. मात्र, लहान गुंतणूकदारांना फटका बसतो. अशावेळी गुंतवणूकदारांनी घाबरू नये. पटकन नफा मिळणार नाही. त्यामुळे 5-6 वर्षांसाठी चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक कायम ठेवावी. 5-6 वर्षांसाठी थांबावे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा. सट्टेबाजी अशा स्थितीत करू नये, ते धोकादायक ठरू शकते. सोन्याचे भाव वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम सोन्यावरही होतो. पुढे आणखी भाव मिळेल. चांगला परतावा मिळेल, असंही ते म्हणालेत.
हेही वाचाः
खरंच डबल इंजिन सरकारमुळेच शेअर बाजार तेजीत; नेमकं कारण काय?
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात चढउतार; निफ्टी 26 अंकांनी घसरून बंद