गुरुग्राम: गुरुग्राम येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांनी ७० वर्षीय रुग्णावर दुर्मीळ शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी अवघड असणारी शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पित्ताशयातून ८,१२५ खडे यशस्वीरित्या काढले.
पोटात असणाऱ्या खड्यांमुळे गुरुग्राममधील रुग्णाला काही वर्षांपासून प्रचंड वेदना जाणवत होत्या. रुग्णाला अनेक वर्षांपासून पोटदुखी, अधूनमधून येणारा ताप, भूक न लागणं आणि अशक्तपणाचा त्रास सुरू होता. कधीकधी छातीवर दडपण येत असल्यानं रुग्ण त्रस्त होता. शस्त्रक्रिया करून हजारो खडे काढल्यानंतर रुग्णानं सुटकेचा निश्वास टाकला आहे.
तासभर चालली शस्त्रक्रिया - सुमारे १ तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्या रुग्णाच्या पोटातील पित्ताशयातील छोटे खडे काढण्यात आले. अनेक वर्षांपासून त्रास सुरू असतानाही रुग्ण उपचाराला टाळाटाळ करत होता. मात्र, वेदना असह्य झाल्यानंतर रुग्णानं फोर्टिस गुरुग्रामध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतला. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पोटाचा अल्ट्रासाउंड करण्यात आला. पित्ताशयातील जडपणा पाहून डॉक्टरांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. त्याच्या पित्ताशयात जमा झालेले हजारो खडे काढून टाकले. २ दिवसांनंतर रुग्णाला रुग्णालयातून सोडण्यात आले.
- ६ तास खड्यांची मोजणी: शस्त्रक्रियेनंतर पोटातील खडे मोजताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी ६ तास बसून शस्त्रक्रियेतून काढलेले खडे मोजले. तेव्हा एकूण खडे ८,१२५ असल्याचं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.
पित्ताशयाचा कर्करोग होण्याची असते भीती- फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्राम येथील गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. अमित जावेद म्हणाले, ही शस्त्रक्रिया खरोखरच दुर्मीळ होती. पित्ताशयातील खड्यावर उपचार केले नाहीत तर खडे हळूहळू वाढत राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णानं केलेल्या निष्काळजीपणामुळे एवढे खडे वाढले आहेत. जर आणखी विलंब झाला असता तर रुग्णाची प्रकृती आणखी गंभीर झाली असती. अशा परिस्थितीतही, जर उपचार केले नाहीत तर पित्ताशयामध्ये पू तयार होऊ लागतो. पित्ताशयाचा कर्करोग होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.
- पित्ताशयात खडे कसे बनतात? पित्ताशयातील खडे कोलेस्टेरॉलपासून बनलेले असतात. असे खडे लठ्ठपणा आणि उच्च-कोलेस्टेरॉल आहाराशी संबंधित असतात.