नवी दिल्ली- इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असताना अमेरिकेनं आज थेट इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या आण्विक तळावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर तिसरे महायुद्ध होण्याची भीती व्यक्त होण्यात आहे. जागतिक पातळीवर तणावाची स्थिती निर्माण होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स मीडियावर पोस्ट करत इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, "आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. तसेच अलिकडच्या काळात वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. हा तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजकीय रणनीती पुढे नेण्यासाठी आम्ही आवाहन केलं आहे. प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता लवकरात लवकर पूर्ववत करण्याबद्दल चर्चा केली आहे."
पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी ४५ मिनिटे केली चर्चा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या आण्विक तळावर अमेरिकेनं हल्ल्या केल्याच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी हा फोन केला. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना सध्याच्या परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली. दोन देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुमारे ४५ मिनिटे फोनवर संवाद झाला.
इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता वाढवणारा मित्र आणि भागीदार देश असल्याचं म्हटलं. दोन देशामधील तणाव कमी करण्यासाठी, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीसाठी भारताच्या भूमिकेबद्दल आणि आवाहनाबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
इराणकडून इस्त्रायलला प्रत्युत्तर- अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. अशी तणावाची स्थिती असताना पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला आहे.
'एनपीटीचे गंभीर उल्लंघन'- इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अरघची यांनीही इस्त्रायलला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या अमेरिकेनं इराणच्या शांततापूर्ण अणुप्रकल्पांवर हल्ला केला. हा हल्ला संयुक्त राष्ट्रांच्या सनद, आंतरराष्ट्रीय कायदा आणि एनपीटीचं गंभीर उल्लंघन आहे.
इराणनं पर्याय राखून ठेवले- इराणचे परराष्ट्रमंत्री यांनी म्हटलं, "आज सकाळच्या घटना अतिशय अपमानजनक आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रत्येक सदस्यानं या अत्यंत धोकादायक, अराजक आणि गुन्हेगारी वर्तनाबद्दल काळजी व्यक्त केली पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या स्वसंरक्षणार्थ कायदेशीर प्रतिसाद देण्याची परवानगी देणाऱ्या त्याच्या तरतुदींनुसार इराणनं आपलं सार्वभौमत्व, हित आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी सर्व पर्याय राखून ठेवले आहेत."
अमेरिकेनं इराणवर कसा केला हल्ला- इराणच्या अणुकार्यक्रमाला इस्त्रायलसह अमेरिकेचा कडाडून विरोध आहे. इराणचा आण्विक कार्यक्रम कमकुवत करण्यासाठी अमेरिकेनं इस्रायमधील तीन ठिकाणी हल्ला केला. ही आण्विक तळ नष्ट करण्यासाठी अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि 30,000 पौंडच्या (13,600 किलोग्रॅम) बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला.
हेही वाचा