नवी दिल्ली- भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला जोरदार फटकारलंय. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा केलाय. त्यांनी लवकरच हा परिसर रिकामा केला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुधारणांवरील चर्चेत पाकिस्तानने वारंवार जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख केल्यानंतर भारताने यावर तीव्र आक्षेप घेतलाय. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश म्हणाले की, पाकिस्तानने वारंवार भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख करणे अयोग्य आहे. हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, याचाही त्यांनी पुनरुच्चार केलाय.
पाकिस्तानने बेकायदेशीर कब्जा सोडावा : हरीश म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रतिनिधीने भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरबद्दल अनुचित टिप्पणी केलीय, त्यामुळे भारताला त्यावर बोलावे लागतेय. त्यांच्या बेकायदेशीर दाव्यांना भारत कधीही मान्यता देणार नाही. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादाचे आम्ही कधीच समर्थन करीत नाहीत. पाकिस्तानला बेकायदेशीर ताबा सोडावा लागणार असल्याचंही हरीश यांनी ठणकावून सांगितलंय.
पाकिस्तानने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये : हरीश पुढे म्हणाले की, आम्ही पाकिस्तानला सल्ला देऊ की, त्यांनी त्यांचा संकुचित आणि फूट पाडणारा अजेंडा पुढे नेण्यासाठी या व्यासपीठाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षा परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेवरील चर्चेदरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक सय्यद तारिक फतामी यांनी जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख केला होता, त्यांच्या विधानानंतर भारताकडून ही प्रतिक्रिया आलीय.
पाकिस्तानला यापूर्वीही फटकारण्यात आलंय : गेल्या आठवड्यातही पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकार उल्लंघनाचे खोटे आरोप केले होते. जिनिव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत भारताने यावर जोरदार टीका केली होती. भारतानेही मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप फेटाळून लावले होते.
पाकिस्तानने दहशतवादमुक्त वातावरण निर्माण करावे : भारतीय राजदूत क्षितिज त्यागी म्हणाले होते की, पाकिस्तानचे तथाकथित नेते आणि प्रतिनिधी त्यांच्या लष्करी-दहशतवादी वृत्तीनुसार खोटी माहिती सतत पसरवत आहेत हे पाहून दुःख होते. भारत नेहमीच म्हणतो की, त्याला पाकिस्तानसोबत सामान्य शेजारी संबंध हवे आहेत. पण दहशतवाद आणि शत्रुत्वापासून मुक्त वातावरण निर्माण करणे ही इस्लामाबादची जबाबदारी आहे.
परराष्ट्रमंत्र्यांनी काश्मीरचा तोडगा सांगितला : 5 मार्च रोजी लंडनस्थित थिंक टँक असलेल्या चॅथम हाऊस येथे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी असेही म्हटले होते की, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) रिकामा केल्यानंतर काश्मीर प्रश्न पूर्णपणे सुटेल. काश्मीर प्रश्नावर परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, त्यातील बहुतेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चांगले काम केलंय. मला वाटतं कलम 370 रद्द करणे हे पहिले पाऊल होते. यानंतर काश्मीरमध्ये विकास, आर्थिक हालचाली आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे हे दुसरे आहे. येथे निवडणुका घेणे हे तिसरे पाऊल होते. मला वाटतं आपण ज्या भागाची वाट पाहत आहोत. तो काश्मीरचा चोरीला गेलेला भाग परत मिळवण्याची वेळ आलीय. तो भाग पाकिस्तानच्या बेकायदेशीर कब्जाखाली आहे. जेव्हा तो परत येईल, तेव्हा मी तुम्हाला खात्री देतो की काश्मीर प्रश्न सुटलेला असेल, असंही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते.
हेही वाचाः
दंतेवाडा-बिजापूर सीमेवर सुरक्षा दल अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक, आतापर्यंत तीन नक्षलवादी ठार
केंद्र सरकारकडून खासदारांना वेतनवाढीसह भत्त्यांमध्ये घसघशीत वाढ, किती मिळणार लाभ?