हैदराबाद : मध्य प्रदेशातील नवविवाहित जोडपं राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या प्रकरणात सोमवारी अचानक एक ट्विस्ट आला. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेली सोनम रघुवंशी आज उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सापडली. पोलिसांनी तिला राजा रघुवंशी हत्याकांडातील संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलं आहे. सध्या गाझीपूर पोलिसांनी तिला चौकशीसाठी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलं आहे, जिथं तिची सखोल चौकशी केली जात आहे.
काय आहे प्रकरण? : दरम्यान, इंदूर येथील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांचं लग्न 11 मे रोजी सोनमसोबत झालं होतं. लग्नानंतर 20 मे रोजी हे जोडपं हनिमूनसाठी मेघालयमधील शिलाँगला रवाना झाले. शिलाँगला पोहोचल्यानंतर त्यांचा 25 मेपर्यंत कुटुंबाशी संपर्क होता. मात्र, अचानक दोघांचेही फोन बंद झाल्यानंतर राजा यांचं कुटुंब चिंतेत होतं. दोघंही बेपत्ता झाल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी राजा यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टममध्ये राजा रघुवंशी यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, सोनमचा काहीच पत्ता लागत नव्हता तिचा शोध सुरू होता. यादरम्यान, राजा यांच्या कुटुंबानं मेघालय सरकारवर आरोप करत पोलीस सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. तसंच सीबीआय चौकशीची त्यांनी मागणी केली होती.
बेपत्ता असलेली सोनम सापडली : या घटनेनंतर आता अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेली सोनम रघुवंशी हिला आज उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सापडली. पोलिसांनी तिला राजा रघुवंशी हत्याकांडातील संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलं आहे. सध्या गाझीपूर पोलिसांनी तिला चौकशीसाठी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलं आहे, जिथं तिची सखोल चौकशी केली जात आहे. सोनमनं सुपारी देऊन पतीची हत्या केल्याचा संशय आहे. तिनं पतीची हत्या का केली? तिनं हत्येची योजना कशी आखली? हत्येत सहभागी असलेले लोक कोण आहेत? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
काय आहे वन स्टॉप सेंटर? : दरम्यान, केंद्र सरकारनं 1 एप्रिल 2015 रोजी निर्भया निधीद्वारे संपूर्ण भारतात वन स्टॉप सेंटर्स स्थापन करण्याची योजना आखली होती. आपल्या माहितीसाठी, याला सखी वन स्टॉप सेंटर असेही म्हणतात. या सेंटरच्या स्थापनेचा मुख्य उद्देश हिंसाचारानं पीडित आणि संकटात असलेल्यांना वैद्यकीय, कायदेशीर समुपदेशन आणि मानसिक मदतीसह पोलीस सुविधा प्रदान करणं आहे. केंद्राच्या या योजनेद्वारे 100 टक्के मदत दिली जाते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 730 हून अधिक वन स्टॉप सेंटर बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या 704 सेंटर्स कार्यरत आहेत.
हेही वाचा :