बंगळुरू : कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या सीमाप्रश्नावरुन मोठं राजकारण रंगलं आहे. या प्रकरणी कर्नाटकमधील काही संघटनांनी एकत्र येत आज 'कर्नाटक बंद'ची हाक दिली होती. मात्र राज्यातील इतक्या सगळ्या संघटना एकत्र आल्यानंतरही कर्नाटकमधील बंदचा जनजीवनावर कोणताही विपरित परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट झालं. कर्नाटकातील नागरिकांनी आजचा बंद झुगारुन लावला आहे. या संघटनांनी आयोजित केलेल्या आजच्या बंदचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांना मोठा दणका बसला आहे.
बस वाहकावर झालेल्या हल्ल्याचा कांगावा : बेळगाव इथं मराठी न येणाऱ्या एका वाहकावर कथित हल्ला करण्यात आल्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील सीमावर्ती परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर कन्नड समर्थकांनी शनिवारी कर्नाटक बंद करण्याचं आवाहन केलं. मात्र नागरिकांनी राजकीय पोळी भाजणाऱ्यांना चांगलाच दणका देत कर्नाटक बंदचा पुरा फज्जा उडवला.
आंदोलकांच्या आवाहनाला दुकानदारांचा घरचा आहेर : राज्याच्या कानाकोपऱ्यात आंदोलकांनी दुकानदारांना आवाहन करत 'कर्नाटक बंद'मध्ये सहभागी होण्यासाठी रस्त्यावर निदर्शनं केली. मात्र दुकानदार आणि व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद न करता आंदोलकांचं आवाहन धुडकावून लावलं. बससेवा आणि जनजीवनावर 'कर्नाटक बंद'चा कोणताही परिणाम झाला नाही. बंगळुरूत कार्यकर्त्यांनी म्हैसूर बँक सर्कलवर जमून जोरदार घोषणाबाजी केली. तर काही कार्यकर्त्यांनी मॅजेस्टिक इथल्या बीएमटीसी आणि केएसआरटीसी बस स्टँडवर निदर्शनं केली. आंदोलकांनी बस चालक आणि वाहकांना आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी आंदोलकांना प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतलं.
म्हैसूर, धारवाडमध्येही जनजीवन सुरळीत : कर्नाटक प्रो संघटनांनी आज राज्यभर बंद पुकारण्याचं आवाहन केलं. मात्र या संघटनांनी पुकारलेल्या बंदला नागरिकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी म्हैसूर इथल्या बस स्थानकावर घोषणाबाजी केली. धरणं आंदोलनही करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतलं. बल्लारी, धारावाड, हवेरी, गडग, बागलकोट आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये बस आणि इतर सेवा सुरळीत सुरू आहेत. भाजीपाला आणि इतर दुकानं खुली आहेत. सामान्य जनजीवनावर या बंदचा कोणताही परिणाम झाला नाही.
हेही वाचा :