हिसार (चंदीगड)- भारत- पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना सीमेवर सैन्य प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावित आहे. अशातच देशातील यूट्यूबर ही पाकिस्तानची हेर असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. हरियाणाच्या हिसार पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाची महिला युट्यूबर ज्योती मल्होत्राला (Jyoti Malhotra) अटक केली आहे. न्यायालयानं ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोण आहे ज्योती मल्होत्रा ? : ज्योती मल्होत्रा ही हरियाणामधील हिसारची रहिवासी आहे. ती३३ वर्षाची असून हिसारमधील अग्रसेन कॉलनीत राहते. तिने बीए पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्योती मल्होत्रा अद्याप अविवाहित आहे. ती दिल्लीत राहते. हरीश कुमार मल्होत्रा असे ज्योतीच्या वडिलांच नाव आहे. तिच्यावर तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीविरोधात कोणताही जुना गुन्हा दाखल नाही.


नोकरीनंतर सुरू केलं ब्लॉगिंग- ज्योती गुरुग्राममधील खासगी कंपनीत काम करत होती. पण कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर तिनं ब्लॉगिंग सुरू केलं. सोशल मीडियावर खूप सक्रिय राहिल्यानंतर पाहता पाहता ती सोशल मीडियात स्टार बनली. ज्योती मल्होत्राचे यूट्यूबवर ३.७७ लाखहून अधिक सबस्क्राइबर आहेत. तर फेसबुकवर तिचे ३.२१ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ती सतत फोटो पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर १.३२ लाख लोक ज्योतीला फॉलो करतात. ज्योती मल्होत्रा काश्मीरला गेली होती. जानेवारी २०२५ मध्ये पहलगामला भेट दिली होती. तिनं सोशल मीडियावर सैन्यदलाचे फोटोदेखील पोस्ट केले होते.

घरातून घेतलं ताब्यात- ट्रॅव्हल विथ जो- ज्योतीनं 'ट्रॅव्हल विथ जो' नावानं सुरू केलेले यूट्यूब चॅनेल लोकप्रिय आहे. त्यामध्ये ती देश-विदेशातील पर्यटनस्थळाच्या भेटीचे व्हिडिओ अपलोड करते. ज्योतीनं पाकिस्तानला भेट देत अनेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले आहेत. हिसार पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपावरून ज्योती मल्होत्राला तिच्या घरातून ताब्यात घेतलं. तिच्याविरुद्ध हिसार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप- हिसार पोलिसांच्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होती. तिनं भारताची गोपनीय माहिती त्यांना पुरविली. पाकिस्तानला भेट दिल्यानंतर ज्योती मल्होत्रावर बऱ्याच काळापासून भारतीय सुरक्षा एजन्सी नजर ठेवून होते. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रासह ४ जणांना हरियाणाच्या वेगवेगळ्या शहरांमधून अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तान उच्चायोगाच्या कर्मचाऱ्याशी संबंध- ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तान उच्चायोगमधील (पीएचसी) कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात होती. दोघांचे अत्यंत जवळचे संबंध होते. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार ती २०२३ मध्ये व्हिसासाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची भेट अहसान उर रहीम उर्फ दानिशशी झाली. त्यानंतर दोघे मोबाईल क्रमांकावरून एकमेकांच्या संपर्कात राहिले. पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशला १३ मे २०२५ रोजी भारत सरकारनं हेरगिरीमध्ये सहभागी असल्याबद्दल पर्सना नॉन ग्राटा घोषित केले. त्याला २४ तासात देश सोडण्याचे आदेश दिले.

पाकिस्तानात गुप्तचर अधिकाऱ्यांची घेतली भेट- चौकशीदरम्यानं ज्योतीनं पोलिसांना सांगितलं, दानिशच्या विनंतीवरून ती पाकिस्तानात अली अहवान यालाही भेटली. अली अहवाननं तिच्या प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था केली होती. अली अहवाननं ज्योतीची पाकिस्तानी गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक करून दिली. ज्योतीनं पोलिसांना धक्कादायक माहिती सांगितली. ती राणा शाहबाज आणि शाकीर यांनाही भेटली होती. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिनं शाकीरचा मोबाईल नंबर जाट रंधावा या नावानं मोबाईलमध्ये सेव्ह केला. भारतात परतल्यानंतर, ती व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे पाकिस्तानमधील लोकांशी संपर्कात राहू लागली. तिनं पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला देशाच्या हिताला बाधा होईल, अशी माहिती पाठविली.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांची घेतली भेट- यूट्यूबर ज्योतीनं तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या भेटीचे अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत. तिनं पाकिस्तानच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचंदेखील दिसून आलं आहे. ज्योतीनं तिच्या व्हिडिओ आणि रीलद्वारे दहशतवाद्यांचं नंदनवन असलेल्या पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखविण्याचा प्रयत्न केला. ती नेहमीच पाकिस्तानचे जेवण आणि संस्कृतीची भारताशी तुलना करत होती. पाकिस्तानमध्ये असलेल्या ५ हजार वर्षे जुन्या मंदिरालाही भेट दिली होती. तिने चीन, बांगलादेश, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ आणि भूतानसह अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे.

वडील म्हणाले मित्र बनवावे लागतात- ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी मुलीच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ब्लॉगिंगसाठी मित्र बनवावे लागतात. तिचे पाकिस्तानशी कोणतेही चुकीचे संबंध नाहीत. जर कोणी तिथे जाणार असेल तर ब्लॉगिंगसाठी मित्र बनवावे लागतात. तुम्ही मित्र बनवले नाहीत तर तुम्ही ब्लॉगिंग कसे कराल? तुम्ही मित्र बनवले तर तुम्हाला त्याच्याशी बोलावे लागेल.

हेही वाचा-