नवी दिल्ली - न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्यानं खळबळ उडाली होती. खरं तर १४ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता वर्मा यांच्या घराला आग लागली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, आगीची घटना घडली तेव्हा न्यायमूर्ती वर्मा घरी नव्हते आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तसंच पोलिसांना आग विझवताना एका खोलीत मोठ्याप्रमाणावर रोख पैसे आढळले. पोलिसांमधील वरिष्ठांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर रक्कम जप्त करण्यात आली. मात्र रोख रकमेच्या जप्तीबाबत न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनेबद्दल शुक्रवारी एका वरिष्ठ वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयासमोर धक्का बसल्याचं म्हटलय.
या घटनेमुळे वकिलांना धक्का बसला आहे असं या वकिलाने सांगितलं, तर सरन्यायाधीश डी. के. उपाध्याय यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणाले, "सर्वांनाही तसंच वाटतं. आम्हाला याची जाणीव आहे". वरिष्ठ वकील अरुण भारद्वाज यांनी मुख्य न्यायाधीश उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठासमोर अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून काही पावले उचलण्याचं आवाहन केलं.
वकील भारद्वाज पुढे म्हणाले, "आम्ही व्यवस्थेचा खूप आदर करतो. प्रत्येक न्यायाधीशाचा खूप आदर केला जातो. मात्र या प्रकरणामुळे आमची मनःशांती गेली आणि निराशा झाली आहे. तुम्हीच कृपया काही पावले उचला. मी आता माझे दुःख व्यक्त करत नाही आणि मला खात्री आहे की मी माझ्या अनेक भावांच्या वेदना व्यक्त करत आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी कृपया काही पावले उचला".
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायाधीश वर्मा यांना दिल्ली उच्च न्यायालयातून त्यांच्या पालक अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. त्यांच्या निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केल्याच्या आरोपानंतर ही कारवाई केल्याचं समजतय.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची गुरुवारी संध्याकाळी बैठक झाली आणि त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना त्यांच्या मूळ अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याचा निर्णय घेतला. सरन्यायाधीश खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांच्याकडून तथ्य शोध अहवाल मागवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या कॉलेजियमने एकमताने बदलीची शिफारस करण्याचा निर्णय घेतला.
#WATCH | Delhi | On SC Collegium recommending transfer of Justice Yashwant Varma of Delhi HC to his parent High Court in Allahabad after an adverse report against him, Former President of Supreme Court Bar Association, Vikas Singh says," it is a very serious matter because people… pic.twitter.com/xR0BjgHT37
— ANI (@ANI) March 21, 2025
न्यायाधीश यशवंत वर्मा यांची बदली करण्याची शिफारस सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने केल्याबद्दल, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विकास सिंह यांना विचारलं असता ते म्हणाले, "ही एक अतिशय गंभीर बाब आहे कारण लोकांचा न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर विश्वास आहे आणि जर एखाद्या न्यायाधीशाच्या निवासस्थानी अशा प्रकारची रोकड आढळली आणि जर त्याचे कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नाही तर हे खूप गांभीर्याने घेतले पाहिजे. बदली हा उपाय नाही. प्रथम, अंतर्गत चौकशी झाली पाहिजे. त्यांना राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे आणि न्यायालयात जाऊ नये. यामुळे न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता डळमळीत होते."