नवी दिल्ली/बर्लिन- दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून आश्रय मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारलं आहे. ते बर्लिनच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
परराष्ट्रमंत्री जयशंकर संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरानंतर मी लगेच बर्लिनला आलो आहे. भारत पाकिस्तानशी पूर्णपणे द्विपक्षीय पद्धतीने व्यवहार करणार आहे. त्याबाबत कोणताही संभ्रम नसावा. दहशतवादाविरुद्ध स्वतःचं रक्षण करण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे. या जर्मनीच्या समजुतीला आम्ही महत्त्व देतो.
#WATCH | EAM Dr S Jaishankar says, " i come to berlin in the immediate aftermath of india responding to the pahalgam terror attack. india has zero tolerance for terrorism. india will never give in to nuclear blackmail, and india will deal with pakistan purely bilaterally. there… pic.twitter.com/QhKfFsYmNO
— ANI (@ANI) May 23, 2025
जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल म्हणाले, जर्मनी दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक लढाईला पाठिंबा देईल. दहशतवादाला जगात कुठेही स्थान मिळू नये. त्यामुळे आम्ही दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या सर्वांना पाठिंबा देणार आहोत. शस्त्रसंधी लागू झाल्याबद्दल आम्ही कौतुक करतो. लवकरच तोडगा निघेल, अशी आम्हाला आशा आहे.
जयशंकर यांची तीन देशांना भेट- परराष्ट्रमंत्री जयशंकर हे नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनी या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. ते शेवटच्या टप्प्यासाठी बर्लिनमध्ये पोहोचल्यावर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाठिंबा दिल्याबद्दल जयशंकर यांनी जर्मनीचे आभार मानले. दोन्ही बाजूंनी भू-राजकीय अशांततेदरम्यान स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी भागीदारी वाढविण्यावर चर्चा केली.
- जयशंकर यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, बर्लिनमध्ये चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांना भेटण्याचा मान मिळाला. धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशामधील संबंध दृढ करण्यासाठी आम्ही त्यांच्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.
भारत-पाकिस्तानमध्ये आहे तणावाची स्थिती- २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानविरोधात ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर मोहिम सुरू केली. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केलं. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि जम्मू आणि काश्मीर ओलांडून सीमापार गोळीबार केला. तसेच सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानमधील आठ हवाई तळांवरील रडार पायाभूत सुविधा, संपर्क केंद्रे आणि हवाई क्षेत्रांचे नुकसान केलं. १० मे रोजी भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधी लागू केली. असे असले दोन्ही देशामध्ये तणावाची स्थिती आहे.
हेही वाचा-