श्रीनगर- २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात कुटुंबासह फिरायला आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला करून जम्मू काश्मीरच्या शांततेला सुरुंग लावला. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर स्थानिकांनी मानवतेचं दर्शन दाखविलं. दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर ३२ वर्षीय शाल विक्रेता सजाद अहमद भट पळून गेला नाही. त्यानं जखमी पर्यटकाला त्याच्या पाठीवर नेऊन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा (एलईटी) ची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटशी (टीआरएफ) संबंधित चार दहशतवाद्यांनी मंगळवारी दुपारी २ वाजता पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन येथे हल्ला केला.
आमच्या मातीत रक्तपात नको- सजाद अहमद भट हे पर्यटकाला पाठीवर घेऊन जात अताना व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांच कौतुक होत आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मला पुरस्कार नको आहे. मला शांती हवी आहे. मला आमच्या पर्यटकांसाठी सुरक्षा हवी आहे. मला आमच्या मातीत रक्तपात नको. आम्ही दहशतवादी नाही. आम्ही यजमान आहोत. काश्मीर हे केवळ संघर्षाचे ठिकाण नाही. ते काळजी, आदरातिथ्य आणि प्रेमाचं ठिकाणदेखील आहे.
त्यांच्याशिवाय आमचं जीवन अपूर्ण- पर्यटकांना मदत करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण ते आमचे पाहुणे आहेत, असे शाल विक्रेता सजाद अहमद भट यांनी फोनवर ईटीव्ही भारतला सांगितले. घोड्यावर स्वार होत असताना दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. आम्ही जखमींना पाणी दिले. ज्यांना चालता येत नव्हते, त्यांना उचललं. आम्ही अनेकांना रुग्णालयात आणलं. आम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. कारण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा लोक मदतीसाठी याचना करत होते. जेव्हा पर्यटकांना रडताना पाहिले, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या आगमनानं आमच्या घरातील दिवे उजळतात. त्यांच्याशिवाय आमचं जीवन अपूर्ण आहे. मी कर्नाटकातील पर्यटकाला वाचवलं. मी त्यांचं नाव कधीच विचारलं नाही.
- दरम्यान, घोडेवाले सय्यद आदिल हुसेन शाह यांनी दहशतवाद्यांना विरोध केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार शाह यांनी थेट दहशतवाद्यांचा सामना केला. ते पळून गेले नाहीत. त्यांना दहशतवाद्यांनी जवळून गोळ्या घातल्या होत्या. ज्या पर्यटकाला वाचविण्यासाठी ते प्रयत्न करत होते, त्याच पर्यटकाच्या मृतदेहाजवळ शाह यांचा मृतदेह आढळला.
दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला २० लाखांचे बक्षीस जाहीर- पोलिसांनी संशयित हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. अनंतनागचा आदिल ठोकर आणि दोन पाकिस्तानी नागरिक - हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई अशी संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार ते टीआरएफच्या तथाकथित 'फाल्कन स्क्वॉड'चे सदस्य आहेत. त्यांना पडण्यासाठी सुरक्षा दलाकडून ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात येत आहे. निमलष्करी दलाच्या तुकड्या त्याचा जंगलात शोध घेत आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर प्रशासनाने प्रत्येक मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
हेही वाचा-