नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं (Allahabad High Court) १७ मार्च रोजी दिलेल्या वादग्रस्त निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायमूर्ती बी आर गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर आज (26 मार्च) या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या प्रकरणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.
बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप : अल्पवयीन मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजम्याची नाडी तोडणे आणि तिला नाल्यात ओढण्याचा प्रयत्न करणे हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न मानला जाणार नाही. यातून फक्त तयारी दिसून येते, जे गुन्हा करण्याच्या प्रत्यक्ष प्रयत्नापेक्षा वेगळं आहे, असं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं, या प्रकरणात दोघांवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.
उच्च न्यायालयात याचिका दाखल : न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या एकल खंडपीठाने दोन आरोपींनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेला अंशतः स्वीकारताना न्यायालयानं ही टिप्पणी केली. दोन्ही आरोपींना आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्काराचा प्रयत्न) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम १८ अंतर्गत खटल्याला सामोरे जाण्यासाठी समन्स बजावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
'ही' घटना बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न नाही : उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यासाठी, त्यांना हे सिद्ध करावं लागेल की कृती अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या तयारीच्या टप्प्याच्या पलीकडची होती. सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, आरोपीने पीडित मुलीचे स्तन पकडले, तिच्या पायजम्याची नाडी तोडली आणि तिला नाल्यात ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु साक्षीदारांनी हस्तक्षेप केल्यावर तो पळून गेला. या प्रकरणाची सुनावणी करताना, अलाहाबाद उच्च न्यायालयानं म्हटलं की, पीडितेच्या गुप्तांगांना स्पर्श करणे, तिच्या पायजम्याची नाडी तोडणे आणि तिला नाल्यात ओढून पळून जाण्याचा प्रयत्न करणे हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न या गुन्ह्यात येत नाही. याला निश्चितच विनयभंगासारखा लैंगिक छळ म्हणता येईल. या प्रकरणाची सुनावणी आज बुधवारी पार पडली. सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली.
हेही वाचा -
- उमरगाम बलात्कार प्रकरण : नराधमाचा तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; न्यायालयानं 6 महिन्यातच ठोठावली जन्मठेप
- 'दिशा सालियनवर बलात्कार करुन हत्या', मुंबई पोलिसांचा तपास म्हणजे धूळफेक; केस सीबीआयकडे सोपवा, दिशाच्या वडिलांची मागणी
- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अन् 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार; दोन्ही घटनेतील नराधम फरार