हैदराबाद : ड्रग्ज आणि मनी लँड्रींग प्रकरणातील आरोपी असल्याचा दावा करत निवृत्त शास्त्रज्ञांला सायबर भामट्यांनी करोडो रुपयांचा चुना लावला. ही धक्कादायक घटना हैदराबादमधील उप्पल इथं उघडकीस आली. या भामट्यांनी वैज्ञानिकाला व्हॉट्सअॅप कॉल करुन त्यांना तीन दिवस डिजिटल अटक केली. यावेळी भामट्यांनी फेक न्यायालय उभारुन फेक न्यायाधीश समोर आणले. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसमोर साक्ष द्यावी लागेल, असंही निवृत्त शास्त्रज्ञला सांगितलं. त्यामुळे निवृत्त वैज्ञानिकानं आयकर भरुन अटक टाळण्यासाठी तब्बल 1 कोटी 34 लाख रुपये भामट्यांना दिले.
मनी लाँड्रिंग आणि ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याचा दावा : हैदराबाद इथल्या सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये असलेले मुख्य शास्त्रज्ञ निवृत्त झाले आहेत. ते सध्या हैदराबाद शहरातील उप्पल परिसरात राहतात. या शास्त्रज्ञानांच्या फोनवर 31 मे रोजी एका नवीन नंबरवरून फोन आला. यावेळी कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीनं "मी टेलिकॉम विभागातून बोलत आहे. बंगळुरूच्या अशोकनगर पोलीस ठाण्यात तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं सांगितलं. त्यानंतर त्यानं पोलीस अधिकारी संदीप राव बोलत असल्याचं सांगून "तुमच्या आधार कार्डाचा गैरवापर सुदाखत खान नावाच्या गुन्हेगारानं केला आहे. गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला कंबोडिया, म्यानमार आणि फिलीपिन्समध्ये मानवी तस्करीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. त्यानं तुमचं नाव त्या प्रकरणातील संशयितांच्या यादीत आहे' असं सांगितलं. तर यानंतर सीबीआय अधिकारी आकाश कुलारी यांच्या नावानं आणखी एका सायबर भामट्यानं फोन केला. त्यानं लवकरच तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं जाईल, अशी धमकी दिली. अटक टाळण्यासाठी, बँक खात्यातील व्यवहारांची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडं पाठवावी लागेल. जर अनधिकृत व्यवहार असतील, तर सर्वोच्च न्यायालयाचे अकाउंटंट त्या तपासतील, असं सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर द्यावी लागेल साक्ष : सायबर भामट्यांनी दिलेल्या धमकीनंतर निवृत्त शास्त्रज्ञानं आपल्या बँक खात्यातील तपशील पाठवला. मात्र या तपशिलामध्ये अनधिकृत तपशील आढळून आल्याचा दावा यावेळी करण्यात आला. त्यामुळे भामट्यानं त्यांना "त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर साक्ष द्यावी लागेल. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होईल. या सुनावणीच्या वेळी पांढरा शर्ट घालावा लागेल," असं या भामट्यानं त्यांना सांगितलं.
भामट्यांना पाठवले 1 कोटी 34 लाख रुपये : भामट्यानं सांगितलेल्या गोष्टी खऱ्या मानून निवृत्त शास्त्रज्ञानं त्यांच्या पत्नीसह व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलला हजेरी लावली. न्यायाधीशांच्या पोशाखात न्यायालयाचे फोटो घेऊन व्हिडिओ कॉलमध्ये दिसलेल्या आरोपीनं काही कागदपत्रं दाखवली. अटक टाळण्यासाठी बँक खात्यांमधील पैसे जमा करावेत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तपास पूर्ण झाल्यानंतर जमा केलेले पैसे खात्यांमध्ये परत केले जातील, असंही त्यांना यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे या शास्त्रज्ञांनी तीन वेळा या भामट्यांना 1 कोटी 34 लाख रुपये पाठवले. पैसे मिळाल्यानंतर भामट्यांनी व्हिडिओ कॉल करणं बंद केलं. निवृत्त शास्त्रज्ञानं या प्रकरणाबद्दल त्यांच्या ओळखीच्या नागरिकांशी संपर्क साधला. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर भामट्यांनी पैसे लुटल्याचं कळताच त्यांना धक्का बसला. त्यांनी रचकोंडा सायबर गुन्हे पोलिसांकडं संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :