बिहार निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता; १०० टक्के वेबकास्टिंगसह निवडणूक आयोगानं घेतलेत महत्त्वाचे निर्णय
भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बिहारमधील महत्त्वाच्या राजकीय टप्प्याची सुरुवात होईल.


Published : October 6, 2025 at 12:27 PM IST
नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोग आज (६ ऑक्टोबर २०२५) आज सायंकाळी ४ वाजता बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी त्यांचा बिहार दौरा संपवला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी सांगितलं, बिहारमधील मतदार यादी २२ वर्षांनंतर शुद्ध केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत. एसआयआर यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे बिहारमधील मतदार यादी शुद्ध करण्यात आली आहे. २२ वर्षांच्या अंतरानंतर असे शुद्धीकरण झालं आहे. आता ही प्रक्रिया देशभरात राबविली जाईल.
सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग- मुख्य निवडणूक आयुक्तांनी २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत अनेक उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. नोंदणीनंतर १५ दिवसांच्या आत मतदारांना EPIC कार्ड वितरित केले जाणार आहे. त्यासाठी एक नवीन मानक कार्यप्रणाली सुरू करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझिट सुविधा देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर जास्त गर्दी टाळण्यासाठी, कोणत्याही बूथवर १,२०० पेक्षा जास्त मतदार नसावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग आणि EVM डेटामध्ये विसंगतीच्या तक्रारी असल्यास VVPAT स्लिपची अनिवार्य पडताळणी करण्यात येणार आहे.
३.६६ लाखांहून अधिक नावे वगळली- बिहार विधानसभा निवडणूक प्रक्रिया चालू विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी म्हणजे २२ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे. ऑगस्टमध्ये मसुदा यादी प्रकाशित होण्यापूर्वी ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यानंतरच्या महिन्याभराच्या दाव्यांमध्ये आणि आक्षेपांनंतर आणखी ३.६६ लाख नावे वगळण्यात आली. अपात्र घोषित झालेले, देशाचे नागरिक नसलेले, मृत्यू झाल्यानं, किंवा इतरत्र स्थलांतरित झालेले आणि नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवण्यात आल्यानं नावे वगळण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी आणि छठसारख्या सणांचा परिणाम होऊ नये, याकरिता वेळापत्रक काळजीपूर्वक करण्यात येणार आहे.
प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षदेखील निवडणुकीत उतरणार- २०२५ ची निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (युनायटेड) यांच्या सत्ताधारी युती विरोधात राष्ट्रीय जनता दलासह काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महागठबंधन निवडणुकीत उतरणार आहे. राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षदेखील बिहारच्या राजकारणात एक पर्यायी शक्ती म्हणून स्वतःला आजमविणार आहे. २०२० मध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं १२५ जागांसह बहुमत मिळवले होते. तर महागठबंधनने ११० जागा जिंकल्या होत्या. ७५ जागांसह राजद सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता.
हेही वाचा-

