नवी दिल्ली - निवडणूक आयोगानं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काँग्रेसला एक सविस्तर पत्र लिहून महाराष्ट्र निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीबद्दलचे त्यांचे दिशाभूल करणारे दावे फेटाळून लावले होते. आता निवडणूक आयोगाला थेट पत्र लिहिण्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा तीच मागणी केली आहे, असं निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी शनिवारी सांगितलं. याबाबतचे वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
संवादासाठी काँग्रेसला दिलं होतं पत्र : राहुल गांधी स्वतः निवडणूक आयोगाला पत्र लिहून उत्तर मिळविण्यास का टाळाटाळ करत आहेत हे स्पष्ट नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं की, "निवडणूक आयोगानं काँग्रेस (INC) ला १५ मे रोजी होणाऱ्या संवादासाठी आमंत्रण दिलं होतं. तथापि, काँग्रेसच्या विनंतीवरून ही बैठक नंतर रद्द करण्यात आली."
...तर शंका दूर होतील : राजकीय पक्षांनी नामांकित केलेल्या बूथ लेव्हल एजंट्स (BLAs) साठी ECI प्रशिक्षण सत्रे आयोजित करत आहे. काँग्रेस पक्षातील अनेक BLAs ने आधीच IIIDEM मध्ये प्रशिक्षण घेतले आहे. सूत्रांनी सांगितलं की, "निवडणूक आयोग काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना निवडणूक प्रक्रियेवर असेच प्रशिक्षण देण्यास तयार आहे. अशा प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेबाबत निर्माण झालेल्या कोणत्याही शंका दूर होण्यास मदत होऊ शकते."
राहुल गांधी यांचा आरोप : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी इंग्रजी दैनिकात एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत "हेराफेरी" झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान, हे सर्व आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोग त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.
हेही वाचा -