नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सेन्सॉर बोर्डानं फुले चित्रपटाच्या निर्मात्यांना काही दृश्ये काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वर टीका केली. एक्स वर लिहिताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि आरएसएसवर चित्रपट "सेन्सॉर" केल्याचा आरोप केला आणि सरकार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष पडद्यावर आणू इच्छित नसल्याचा आरोप केला. "एकीकडे भाजपा-आरएसएस नेते महात्मा फुलेंना वरवर श्रद्धांजली वाहतात आणि दुसरीकडे ते त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सेन्सॉर करत आहेत! महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जातीवादाच्या विरोधात लढण्यासाठी समर्पित केले. परंतु सरकार तो संघर्ष आणि त्यातील ऐतिहासिक तथ्ये पडद्यावर आणू इच्छित नाही," असे राहुल गांधी यांनी एक्स वर लिहिले आहे.
"प्रत्येक पावलावर, भाजपा-आरएसएस दलित-बहुजन इतिहास पुसून टाकू इच्छित आहे. जेणेकरून जातीय भेदभाव आणि अन्यायाचे खरे सत्य समोर येऊ नये," असे राहुल गांधी पुढे म्हणाले. समाजसुधारक ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील बायोपिक 'फुले'च्या निर्मात्यांना प्रदर्शित होण्यापूर्वीच जातीशी संबंधित काही दृश्ये काढून टाकण्याचे आदेश सीबीएफसीने दिल्यानंतर राहुल गांधींनी कडक टीका केली. हा चित्रपट आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार होता.
BJP-RSS के नेता एक तरफ फुले जी को दिखावटी नमन करते हैं, और दूसरी तरफ उनके जीवन पर बनी फिल्म को सेंसर कर रहे!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 11, 2025
महात्मा फुले और सावित्रीबाई फुले जी ने जातिवाद के खिलाफ लड़ाई में पूरा जीवन समर्पित कर दिया, मगर सरकार उस संघर्ष और उसके ऐतिहासिक तथ्यों को पर्दे पर नहीं आने देना चाहती।…
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात सीबीएफसीविरुद्ध निदर्शने केली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर चित्रपटातील दृश्ये काढून टाकली तर चित्रपटाचा उद्देशच नष्ट होईल. "जर फुलेमधून ती दृश्ये काढून टाकली तर चित्रपटाचा उद्देशच नष्ट होईल... आम्ही सेन्सॉर बोर्डाच्या मनमानी कारवायांविरुद्ध आवाज उठवत आहोत," असे ते म्हणाले. फुले चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले आहे, या चित्रपटात प्रतीक ज्योतिराव फुले आणि पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत. या कथेत जातीभेद आणि लिंग असमानतेविरुद्धचा त्यांचा लढा अधोरेखित केला आहे.
हेही वाचा...